
जून महिन्यात शिंदे गटाने भाजपसोबत जात नवं सरकार आणलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधी बाकांवर गेले. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असं अजित पवार म्हणाले.
‘सत्तेचा माज येऊ दिला नाही’, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्यं केलं. ‘एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्षे होतो. आमच्यातर्फे पवार साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. राज्यातील सत्ता होती. जिल्हा परिषद होती. एखाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. इतर संस्थाही ताब्यात होत्या. मात्र आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही’, अशा शब्दात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
‘राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही’, असा इशारा अजित पवार यांनी बोलताना दिला.
‘जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला त्रास दिला, तर ते मी सहन करणार नाही. आमच्या लोकांचं काही चुकलं, अगदी मी चुकलो तरी कारवाई करा. कारण कायदा नियम सर्वांना सारखाच आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘कुणाची काही चूक नसताना, काही दोष नसताना केवळ सत्तेत असणारा माणूस सांगतो, म्हणून कुणालातरी त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे, अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. हे संविधानाने कुणाला शिकवलेलं नाही. नियम, कायदे सर्वांना सारखे असतात, याची दखल सर्वांनी घ्यावी’, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.




























































