खेडमध्ये डंपरची चोरी करणारी टोळी गजाआड; पाचजणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅस कटरच्या सहाय्याने डंपरचे तुकडे करून चोरी करणाऱ्या टोळीला खेड पोलिसांनी गजाआड केले असून एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथे भरतबेन्झ कंपनीचा डंपर गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच डंपर मालकाने यातील दोन आरोपींना रंगेहाथ पकडून खेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूण पाच जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. या पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात भंगार व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी त्यादृष्टीने तापसकार्य सुरू केले आहे. डंपरची चोरी करण्यासाठी आरोपींनी ऑक्सिजन सिलेंडर, एचपी कंपनीचा व्यावसायिक सिलेंडर, गॅस कटर याचा वापर केला होता. चोरीचा मुद्देमाल नेण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी मालवाहू वाहन व एक दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या चोरी प्रकरणात जनार्दन पांडुरंग पवार, सचिन परशुराम तटकरे, अनिल तुकाराम महाडिक, अनिल अशोक जाधव व जयेश बाळाराम आंब्रे या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी भरतबेन्झ कंपनीचा डंपर गॅस कटरने पूर्णतः उद्धवस्त केला असून डंपरचा हौदा, टायर, चेसी कट करून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.

दरम्यान चोरट्यांना चोरीसाठी ऑक्सिजन सिलेंडर व अन्य साहित्य कोणी पुरवले याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी गॅस कटर व एचपी कंपनीचा व्यावसायिक सिलेंडर सापडल्याने या चोरीमध्ये भंगार व्यावसायिकांचा देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबिन शेख हे अधिक तपास करत आहेत.