परतीच्या पावसाने सांगलीला पुन्हा झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यात सलग दुसऱया दिवशी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. कोयना धरण 100 टक्के भरल्याने धरणातून चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वाळवा, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, तसेच खानापूर तालुक्यांत धुवाँधार पाऊस झाला. कमी वेळात पडणाऱया जोरदार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजविला आहे.

जिह्याच्या बहुतांशी भागात गेल्या तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी पुन्हा सलग दुसऱया दिवशी दमदार पाऊस बरसला. धरण पाणलोटक्षेत्रातही पाऊस होत आहे. कोयना धरण 100 टक्के भरल्याने धरणातून चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाची संततधार आणि धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी संध्याकाळी नऊ फुटांवर होती.

शेतशिवार जलमय झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, भात, मका, द्राक्षबागांना या पावसाने फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती आहे.