
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची शिक्षण संचालनालयाने अखेर सांगता केली आहे. प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी वारंवार ऑनलाईन फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात येत होती. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, पनवेल शहर या भागातील तब्बल 2 लाख 76 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर 99 हजार 76 इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 316 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत.
मुंबई विभागात तब्बल 3 लाख 73 हजार 915 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी ऑगस्टपासून ऑनलाईन प्रवेशाला प्रारंभ झाला. मुंबई महानगर क्षेत्रात 3 लाख 73 हजार 915 जागांसाठी 3 लाख 24 हजार 656 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण संचालनालयाने तीन नियमित फेऱया, तीन विशेष फेऱया त्यानंतर 27 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली. या सर्व फेऱयांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 2 लाख 76 हजार 119 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर 99 हजार 76 जागा रिक्त राहिल्या आहेत.

























































