
गृहमंत्री झाल्यावर नकारात्मक गोष्टीच जास्त ऐकाव्या लागतात. त्यामुळे मी सकाळची ब्रिफिंग बंद करून दुपारची ब्रिफिंग सुरू केली आहे. डोक्यावरचे केस गेले तरच समजायचे की गृहमंत्री म्हणून चांगले काम केले, असे अजब तर्कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, आवडता बंगला, गृहखाते, राग-सहनशीलता, राशीभविष्य अशा विविध विषयांवर भाष्य केले.
तुम्हाला राग येतो का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, मला तेव्हाच राग येतो जेव्हा मला खूप भूक लागलेली असते. माझ्याकडे खूप सहनशीलता आहे. गेल्या 25 वर्षांत तुम्ही पाहिलेच असेल अशी पुष्टी त्यांनी जोडली. ज्या दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगल लिहिलेले असते तोच दिवाळी अंक मी वाचतो, अशी मिश्कील टिप्पणी फडणवीस यांनी केली.
‘सागर’ बंगल्यावर मी खूश
‘वर्षा’ ते ‘सागर’ बंगला प्रवास कसा वाटतो? असे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, वर्षा अखेर सागरातच जाऊन मिळते. तुम्ही कुठे राहता हे महत्त्वाचे नाही. तर तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचे. मी ‘सागर’ बंगल्यावर खूश आहे. इथे खूप सकारात्मकता आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार
राज्यमंत्री नसवे की त्रास होतो, असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले. कोरोनामुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यावेळी डिसेंबरमध्ये दोन आठवडय़ांचे अधिवेशन होईल, असे ते म्हणाले.






























































