
कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील असळज येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. सहकारी साखर कारखाना चालू झाल्यामुळे या रस्त्यावर ट्रक व ट्रक्टरची वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. उसाने भरलेले ट्रक्टर खड्डय़ांमध्ये जाऊन आतापर्यंत दोन-तीन ट्रक्टर उलटले आहेत. या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक अपघात घडले आहेत. तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने प्रवासी व वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरपासून गगनबावडय़ापर्यंत ठिकठिकाणी रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गगनबावडा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या पूरस्थितीमुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या या रस्त्यावर प्रवास करणाऱया प्रत्येक प्रवाशाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या महामार्गावरील रस्त्यांबाबत खड्डय़ांची समस्या अनेकांनी मांडली; परंतु अधिकाऱयांनी या रस्त्याची दखल घेतली नाही. थोडीफार डागडुजी करून रस्ता दुरुस्त केला. मात्र, तो फक्त दिखाव्यापुरता दुरुस्त झाला. रस्त्याची दुरवस्था अजूनही ‘जैसे-थे’च आहे. यासाठी रस्ता पूर्णतः खड्डेमुक्त होणे गरजेचे आहे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.



























































