
>> मृणाल घनकुटे
दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱयाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक त्वचेला अधिक तजेल आणि टवटवीत ठेवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. तेवढेच नाही तर मासिक फेशियलसाठी स्थानिक सलूनला भेट देणे ही महिलांमध्ये एक सामान्य प्रथा आहे. स्त्रिया त्यांच्या त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि काही दिवस चमकदार आणि मुलायम करण्यासाठी या सौंदर्य पद्धतीचा पर्याय निवडतात, पण या सलून फेशियलमुळे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होत आहे असे दिसून येत आहे. त्याशिवाय सलून फेशियलने मिळणारी चमक दीर्घकाळ टिकत नाही असेही काही स्त्रियांचं मत आहे. अशातच आपल्या चेहऱयाचे सैंदर्य फुलविण्यासाठी ‘मेडी-फेशियल’ हा अतिशय प्रभावी मार्ग मानला जात आहे. ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून ती नेमकी काय आहे, तिचा अनुभव कोणी घ्यावा व ते किती फायदेशीर आहे, याबद्दल तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.
मेडी-फेशियल म्हणजे काय?
मेडी-फेशियल हे वैद्यकीय दर्जाचे फेशियल आहेत जे नियमित सलून फेशियलपेक्षा अधिक प्रभावी आहेत. हे उपचार त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी तयार केले गेले आहेत आणि जवळ जवळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहेत. मेडी-फेशियल उपचार नेहमीच्या फेशियल-क्लिनअप्सपेक्षा वेगळे असतात. अनेक सामान्य महिलांपासून सेलिब्रिटीही ही ट्रीटमेंट सर्रास करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर अनेक पुरुषही मेडी-फेशियल ट्रीटमेंट करून घेत आहेत.
ऑक्सिजन फेशियल, हायड्रो-फेशियल, एएचए फेशियल आणि इतर समस्यांनुसार विविध प्रकारचे मेडी-फेशियल उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला शोभेल व तुमच्यावर अधिक प्रभावी होईल अशी मेडी-फेशियल प्रक्रिया ठरवली जाते. मेडी-फेशियल सुरकुत्या कमी करते आणि कोलेजन पुन्हा निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे निस्तेज आणि थकलेल्या त्वचेला उजडपणा मिळते. मेडी-फेशियल अत्यंत फायदेशीर आहे. त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात, असे द एस्थेटिक्स क्लिनिक, कांदिवलीच्या सहसंस्थापक डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले.
मेडी-फेशियलचे फायदे
मेडी-फेशियलमुळे तुमची त्वचा निरोगी आणि मऊ होऊ शकते. एकदा केल्यानंतर याचा परिणाम चेहऱयावर 4 ते 6 आठवडय़ांपर्यंत राहतो. ही ट्रीटमेंट अनुकूल आणि वैद्यकीयदृष्टय़ा सिद्ध झालेले मशीन वापरून केली जाते, जे त्वचेला दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडी-फेशियल नेहमी अनुभवी कॉस्मेटिक फिजिशियनच्या मार्गदर्शनाखालीच करावी.
सलून फेशियलमध्ये केमिकल रासायनिक ब्लीचिंगचा वापर केला जातो तर त्याउलट मेडी-फेशियलमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड यांसारख्या प्रभावी साहित्यांचा उपयोग केला जातो. चांगल्या स्किनकेअर थेरपीचे योग्य पालन केल्यास त्याचा परिणामही सकारात्मक आणि अधिक काळ टिकणारा असतो. सलूनमध्ये दिले जाणारे जेनेरिक फेशियल सामान्यतः स्टीम आणि ब्लीच आणि इतर उत्पादनांचा वापर करतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या फेशियल त्वचेच्या विशिष्ट परिस्थितींवर उपचार करण्यासाठी प्रभावी नसल्याचे मत डॉ. रिंकी कपूर यांनी व्यक्त केले.



























































