
चीनच्या काही भागात पुन्हा एकदा कोरोना उद्रेक झाल्यानंतर कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. झेंगझोऊमध्ये लोक जिथे आहेत तिथेच त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील फॉक्सकॉन येथे सर्वात मोठ्या आयफोन कारखान्यात कामगारांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र याला कंटाळून अनेकजण झेंगझोऊमधून पळून जाताना दिसत आहेत. यासंदर्भातील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
‘झेंगझोऊमधील फॉक्सकॉन येथे झिरो कोविड पॉलिसीनुसार कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामधून बाहेर पडून Apple च्या सर्वात मोठ्या असेंब्ली साइटवरून कामगार बाहेर पडत आहेत. चोरून बाहेर पडल्यानंतर स्थलांतरीत कामगार वाहन सेवा बंद असल्याने 100 किलोमीटरहून अधिक अंतराचा पायी प्रवास करत गावी जात आहेत. चीनमधील सरकारने याकडे लक्ष देऊन लोकांचे हाल थांबवले पाहिजे’, असे चीनमधील बीबीसीचे प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनेल यांनी ट्विट केले.
Workers have broken out of #Apple’s largest assembly site, escaping the Zero #Covid lockdown at Foxconn in #Zhengzhou. After sneaking out, they’re walking to home towns more than 100 kilometres away to beat the Covid app measures designed to control people and stop this. #China pic.twitter.com/NHjOjclAyU
— Stephen McDonell (@StephenMcDonell) October 30, 2022
चिनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये झेंगझोउच्या मध्यवर्ती शहरात फॉक्सकॉन उत्पादक कंपनीच्या मालकीच्या प्लांटच्या बाहेर कुंपणावरून उडी मारताना लोक दिसत आहेत.
अशी माहिती मिळते की रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक कामगारांना विलगिकरणात ठेवण्यात आले होते.
मॅकडोनेलच्या मते, फॉक्सकॉनमध्ये अंदाजे 300,000 कामगार काम करतात आणि जगातील निम्मे आयफोन येथे बनतात. कोविड लॉकडाऊनमुळे अराजकता, अन्न टंचाई निर्माण झाली आहे. एका व्हिडीओमध्ये हेनान प्रांतातील अनेक स्थलांतरित कामगार पायी घरी परतताना दिसते आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कोणतीही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही.
शनिवारपासून, चिनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये फॉक्सकॉनचे कामगार घरी परतताना दिसत आहे. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून दिवसा शेतातून आणि रात्री रस्त्यांवर चालताना दिसत आहेत.
फॉक्सकॉन मधील कामगारांना मदत करण्यासाठी महामार्गाजवळील स्थानिक रहिवाशांनी मोफत पुरवठा केंद्रे उभारली असल्याचे दिसत आहे. सरकार किंवा फॉक्सकॉनच्या मदतीशिवाय स्थानिकांच्या मदतीमुळे गावी परतणाऱ्यांना थोडा दिलासा मिळत आहे.
हेनान प्रांताची राजधानी असलेल्या झेंगझोऊमध्ये 29 ऑक्टोबर रोजी 167 कोविड रुग्णांची नोंद झाली. मागील सात दिवसांच्या कालावधीत 97 रुग्णांवरून ही संख्या 167 झाल्याने चीनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
सुमारे 10 दशलक्ष लोकसंख्येचे शहर परिणामी बंद करण्यात आले होते. चीनने झिरो कोविड धोरणाचा अवलंब करत याभागात कठोर लॉकडाउन केले आहे.
फॉक्सकॉन, जे यूएसमधील ऍपलला पुरवठादार म्हणून काम करते, त्याच्या झेंगझोऊ कॉम्प्लेक्समध्ये हजारो कामगार आहेत. मात्र किती जण संक्रमित आहेत याची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही.



























































