
पंढरपूर, दि. 8 (प्रतिनिधी) – कॉरिडॉर झाल्यास पंढरपूरची रचना वेगळीच असेल, त्यावेळी फक्त राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष पंढरपूरकडे वेधले जाणार आहे. यामुळे देशातील लोक पंढरपूरकडे आकर्षित होतील. यातून पंढरपुरातील सामान्य नागरिकांची वाटचाल समृद्धीकडे होणार असल्याचे मत वारकरी महामंडळाचे अध्यक्ष व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथील कॉरिडॉरवरून सध्या वादंग माजलेले आहे. एका बाजूला स्थानिक बाधित नागरिक, काही महाराज मंडळी याला विरोध करीत आहेत, तर दुसऱया बाजूला वारकरी संप्रदायातील काही महाराजांनी पाठिंबा दिला आहे. पंढरपूर शहरातील बहुसंख्य नागरिकांचा कॉरिडॉरला पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे सदस्य आणि वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशमहाराज जवंजाळ यांनी कॉरिडॉरचे समर्थन केले.
प्रकाशमहाराज म्हणाले, भविष्याचा वेध घेतला असता, वारीसाठी पूर्वी फक्त पाच लाख भाविक यायचे. परंतु आत्ता ती संख्या 18 लाखांवर पोहोचली आहे. आज येणारी लोकसंख्या आणि पुढच्या 50 वर्षांत येणारी लोकसंख्या याचा विचार केला, तर पंढरपुरात कॉरिडॉर होणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित कॉरिडॉर पूर्ण झाल्यास भाविकांना सोयी, सुविधा तर मिळतीलच; त्याचबरोबर पंढरपूरचे अर्थकारणही बदलेल. यामुळे प्रस्तावित कॉरिडॉरला आपला पाठिंबा असून, तो लवकर सुरू करावा, अशी मागणी जवंजाळ यांनी केली आहे.



























































