
अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर होणाऱया जेईई मेन परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सोशल मिडीयावर सध्या #postponejeemains2023 हा ट्रेंड सुरू आहे. बारावीच्या परीक्षेआधी ही प्रवेश परीक्षा होणार असल्याने इंजिनीयर बनण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी निराश झाले आहेत.
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही फेब्रुवारीमध्येच होणार आहे. त्याआधी या दोन्ही बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षाजानेवारीमध्ये घेण्यात येणार आहे. याचदरम्यान 24 ते 31 जानेवारी रोजी जेईई मेनची परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन कसे आखायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
#postponejeemains2023 याद्वारे विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टींग एजन्सीकडे जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे इंजिनियर बनण्याचे स्वप्न असते मात्र या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.





























































