
पालघर महावितरण विभागाच्या महिला अधीक्षक अभियंता किरण नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने आज बेडय़ा ठोकल्या. त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पालघरचे तक्रारदार यांच्यावर दोन-तीन तक्रारी महावितरण अंतर्गत दाखल असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचे सांगत ही रक्कम तडजोडीनंतर दीड लाख घेण्याचे ठरले. त्यांनर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा व पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप व त्यांच्या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ॊता म्हणून एक लाख रुपये घेताना आज संध्याकाळी दोघांनाही रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दीपक सुमडा, सखाराम दोडे, संजय सुतार, स्वाती तारवी या पथकाने ही कारवाई केली.
























































