मला खोट्या आरोपात फसवण्यात आलं! तुरुंगातून बाहेर येताच अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची अखेर 14 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर सुटका झाली. अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या 100 कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. सचिन वाझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वाझेवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा व्यक्तिच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला 16 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.