
मध्य रेल्वे सध्या प्रवाशांनी खच्चून भरून धावताना दिसत असली तरी त्यांची खरी कमाई प्रवासी वाहतुकीतून नव्हे तर माल वाहतुकीतून होत आहे. मध्य रेल्वेने गेल्या नऊ महिन्यांत रेल्वेने तब्बल 58 दशलक्ष टन मालाची वाहतूक करत साडेसात हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे, तर डिसेंबरमध्ये 795 कोटी रुपये मिळवले असून मागील वर्षाचा विचार करता त्यामध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रेल्वेकडून कोळसा, सिमेंट, लोखंड, कंटेनर, ऑटोमोबाईल आणि इंधनाची मोठय़ा प्रमाणात वाहतूक केली जाते. त्यातून रेल्वेला त्याच्या एकूण महसुलापैकी जवळपास 55-60 टक्के महसूल माल वाहतुकीतून मिळतो. एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत मध्य रेल्वेचे 58.45 दशलक्ष टन माल वाहतूक लोडिंग झाली जी आतापर्यंतची सर्वाधिक ठरली असून आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीचा विचार करता जास्त आहे. डिसेंबरमध्ये 7.52 दशलक्ष टन माल वाहतूक झाली, तर मागील वर्षी याच महिन्यात 7.21 दशलक्ष टन झाली होती.
ऑटोमोबाईल मालाची वाहतूक वाढली
डिसेंबर 2021 मध्ये लोड केलेल्या 51 रेकच्या तुलनेत मध्य रेल्वेने डिसेंबर 2022 मध्ये ऑटोमोबाईलचे 116 रेक लोड केले होते. त्यामुळे मध्य रेल्वेला ऑटोमोबाईल क्षेत्रातील मालाच्या वाहतुकीतून आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळाला आहे. डिसेंबर 2021 मधील कंटेनरच्या 724 रेकच्या तुलनेत रेल्वेने डिसेंबरअखेर 755 कंटेनर लोड करून पाठवले होते. लोह आणि स्टीलचे 132 रेक लोड केले गेले होते.



























































