
हिवाळी अधिवेशनासाठी राज्याच्या उपराजधानीत पाठवलेल्या शासकीय नस्ती (फायली) आणि प्रशासकीय कागदपत्रे पुन्हा मंत्रालयात मागवून घेण्यात आल्या आहेत. वेगवेगळय़ा विभागांच्या फायलींचे गठ्ठे आज मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ठेवण्यात आल्या होत्या.
हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील बहुतांश विभागांची कार्यालये नागपूरला हलवण्यात आली होती. प्रत्येक विभागातील महत्त्वाची कागदपत्रे 16 डिसेंबरपूर्वी नागपूरला पाठवण्यात आली. अधिवेशनासाठी मंत्रालयातील कर्मचारीवर्गही नागपूरला रवाना झाला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे 30 डिसेंबर रोजी सूप वाजले. त्यानंतर नागपूरमध्ये सुरू केलेली विविध विभागांची तात्पुरती कार्यालये बंद करण्यात आली आणि सर्व महत्त्वाच्या फायली पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. आज सोमवारी मंत्रालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी शासकीय फायली व महत्त्वाची कागदपत्रे बॅगांमध्ये भरून मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ठेवल्या होत्या. प्रत्येक विभागाचे कर्मचारी येऊन फायलीच्या बॅगा त्यांच्या विभागात नेत होते. फायलींमुळे मंत्रालय पुन्हा गजबजण्यास सुरुवात झाली आहे; पण मंत्री, त्यांचे पीए-पीएस व इतर कर्मचारीवर्गाने अजून पूर्णपणे उपस्थिती लावलेली नाही.






























































