इस्रो आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून अंतराळ-तंत्रज्ञान स्टार्टअप होणार सक्षम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन -ISRO) आणि मायक्रोसॉफ्टमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्यातून हिंदुस्थानातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सच्या प्रगतीला चालना दिली जाणार आहे. देशभरातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना तंत्रज्ञान साधने आणि व्यासपीठे, बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी पाठबळ पुरवणे तसेच त्यांना प्रगती करून व्यवसायासाठी सज्ज करण्यात मार्गदर्शन करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

हिंदुस्थानातील सर्वाधिक आशादायक अंतराळ तंत्रज्ञान निर्माते आणि उद्योजकांमधील बाजारपेठीय क्षमता हेरून त्यांना अधिक सक्षम करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट साकार करण्याचा प्रयत्न या सहकार्यातून केला जाणार आहे. या सहकार्याच्या माध्यमातून इस्रोने निवडलेल्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब व्यासपीठावर समाविष्ट केले जाईल. या व्यासपीठाद्वारे स्टार्टअप्सना संकल्पना ते युनिकॉर्न अशा प्रत्येक टप्प्यावर साह्य केले जाते.

मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब च्या माध्यमातून हिंदुस्थानातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप फाऊंडर्सना आपला व्यवसाय उभारण्यासाठी, तो चालवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, साधने आणि स्रोते मोफत उपलब्ध होतील. व्यवसायनिर्मिती आणि प्रगतीसाठी अॅझरवर तांत्रिक साह्य, गिटहब एंटरप्राइज, व्हिज्युअल स्टुडिओ एंटरप्राइज आणि मायक्रोसॉफ्ट 365 अशी काही सर्वोत्कृष्ट डेव्हलपर आणि उत्पादकता साधने तसेच पॉवर बीआर आणि डायनॅमिक्स 365 सह स्मार्ट अॅनालिटिक्सची उपलब्धता असे अनेक लाभ स्टार्टअप्सना मिळतील.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, “मायक्रोसॉफ्टसोबत आम्ही केलेल्या या सहकार्यामुळे अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना एआय, मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग यासारख्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून विविध अॅप्लिकेशन्ससाठी प्रचंड प्रमाणातील सॅटेलाइट डेटा वापरता येईल, त्याचे पृथ्थकरण करता येईल. अशा स्टार्टअप्सना आणि तंत्रज्ञान पर्याय पुरवणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब हे अत्यंत उपयुक्त व्यासपीठ आहे आणि यातून राष्ट्रीय अंतराळ तंत्रज्ञान परिसंस्थेला अधिकच बळकटी मिळेल. उद्योजकांना साहाय्य करून, त्यांना पाठबळ देऊन व्यापक पातळीवर एकूणच हिंदुस्थानीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्र येत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत महेश्वरी म्हणाले, “हिंदुस्थानातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्स आपल्या तंत्रज्ञानाच्या बळावर देशाच्या अंतराळ क्षमतांना वृद्धिंगत करण्यात लक्षणीय भूमिका बजावत आहेत. अंतराळ क्षेत्रात शक्य ते बदल वेगाने घडवण्यात इस्रोसोबत सहकार्य करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमची तंत्रज्ञान साधने, व्यासपीठे आणि मार्गदर्शनाच्या संधी या माध्यमातून आम्ही देशातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना अत्याधुनिक नाविन्यपूर्ण निर्मिती आणि वैज्ञानिक शोधांना गती देण्यात सक्षम करण्यास बांधिल आहोत.”

तंत्रज्ञान साह्यासोबतच मायक्रोसॉफ्ट या अंतराळ तंत्रज्ञान उद्योजकांना स्पेस इंजिनीअरिंग ते क्लाऊड टेक्नॉलॉजी, उत्पादने आणि डिझाइन, निधी जमवणे आणि विक्री आणि विपणन अशा सर्वच आघाड्यांवर साह्य पुरवणार आहे. त्याचप्रमाणे संस्थापकांना सुयोग्य स्वरुपातील स्टार्टअपना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि उपक्रमांचा समावेश असलेला मायक्रोसॉफ्ट लर्न उपलब्ध असेल. यामुळे त्यांना उद्योगक्षेत्रात तसेच ग्राहकांशी अधिक व्यापक प्रमाणावर संपर्कजाळे निर्माण करून प्रगतीला चालना देता येईल.

मायक्रोसॉफ्ट आणि इस्रोतर्फे संयुक्तरित्या स्टार्टअप्ससाठी अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांची सत्रे आणि नॉलेज शेअरिंग सत्रे आयोजित करण्यात येतील. त्याचप्रमाणे, या सहकार्यातून संस्थापकांना बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक धोरणे, तांत्रिक साह्य आणि त्यांची उत्पादने मायक्रोसॉफ्ट माध्यमे आणि बाजारपेठांच्या माध्यमातून विकण्याची संधी अशा प्रकारचे साह्यही केले जाईल.