
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 92 वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन उद्या, 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबईच्या वतीने शिवतीर्थावर सुगम संगीत आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ममता दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात श्री सिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, मधुकर वस्त, हर्षदा वेल्हाळ, स्मिता तायशेटे, सुहास जयवंत, चंद्रकांत साखरपेकर, सचिन नवले, सचिन मोहिते, संकेत पांचाळ, बाळा परब, अभय बागायतकर भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
दुसऱया सत्रात दादरच्या आर्यदुर्गा भजन मंडळ आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ या संस्थेच्या वतीने भजनगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथे ममता दिनानिमित्त भजन, कीर्तन, भक्तिगीते आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.
आरोग्य शिबीर
स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने 6 जानेवारी रोजी कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर उत्सव मंडळ, एसआरए बिल्डिंग नंबर 7 जवळ सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबीर होणार आहे. शिबिरात मधुमेह, रक्तदाब, एचबीए1सी तपासणी करून मोफत औषध वाटप, नेत्र व दंतचिकित्सा केली जाणार आहे. यावेळी अल्पदरात चष्मा वाटपही होणार आहे. विभागप्रमुख, आमदार अॅड. अनिल परब व महिला विभाग संघटक संजना मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदिवली विधानसभा उपविभाग संघटक मनीषा नलवडे व ग्राहक संरक्षण कक्ष सहचिटणीस कृष्णा नलवडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी आण्णा मलाई, भास्कर पाटील, साईनाथ कटके, चंदन सावंत, पार्वती दारपुंडे, शुभम कांबळे, सचिन सकपाळ आदी उपस्थित राहतील.


























































