नगरसह पुणे, नाशिकमध्ये साखळीचोरी  करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरासह पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ५२ हजार रुपयांच्या ६.४ तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. रियाज फय्याज इराणी (वय ४२, रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव आहे. माया किरणकुमार वनारसे (रा. सूर्यानगर, तपोवन रोड) यांनी फिर्याद दिली होती

मकर संक्रांतीच्या दिवशी (दि. १५) माया वनारसे या नगर-संभाजीनगर महामार्गावरील फिरोदिया वृद्धाश्रमासमोरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एकाने वनारसे यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे मिनी गंठण ओढून पळ काढला होता. याबाबत िंभगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना एकजण चोरीचे सोने विकण्यासाठी श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच त्यांनी कारवाईसाठी पथक पाठविले. या पथकाने तत्काळ तेथे धाव घेत सापळा रचला. त्यावेळी तेथे आलेला एकजण पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला. पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर यांच्यासह पोलीस अंमलदारांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये नगर शहर परिसरात साथीदारासह चेनस्नॅिंचगचे गुन्हे केले असून, त्यामधील सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपुरात आल्याचे त्याने सांगितले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ३ लाख ५२ हजार रुपयांच्या ६.४ तोळे वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. त्याच्याविरुद्ध पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात जबरी चोरी, चेनस्नॅिंचग व फसवणूक असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत.