राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी परभणीत प्रचारासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
”भाजपने उमेदवार उभे केले असले तरी त्यांना स्वत:चे उमेदवार मिळालेले नाही. एखादा अपवाद वगळता त्यांना कुठेच उमेदवार मिळालेला नाही. त्यांनी इतरांचे उमेदवार पळवले. नाशिकमध्ये त्यांना उमेदवार मिळालेला नाही. असं वेगवेगळ्या भागात घडलेलं आहे.” असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
”आपल्याला आपला उमेदवार विक्रमी मतदानाने निवडणून आणायचा आहे. नागपूर अमरावतीतही महाविकास आघाडीचा उमेदवाराला विजयी करण्याचं काम त्या त्या भागात सुरू आहे. आता दोनच दिवस राहिले आहेत. बिलकूल हलक्यात ही निवडणूक घेऊ नको. मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्हा संस्था चालक म्हणून साऱ्यांना एकत्र बोलवा. एक गेटटुगेदर होईल. संस्था चालकांनी स्वत: मतदान केंद्रावर येऊन निवडणूकांवर लक्ष ठेवावं. 8 जिल्ह्याचं मतदारसंघ आहे. खूप दूरपर्यंत पसरलेला आहे. इथेही महाविकास आघाडीची ताकद चांगली आहे. इथे विक्रम काळेंच्या पाठीवर 1 आकडा टाकायचाय’, असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पलटी मारली
देवेद्र फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट सांगिलेलं की कुठल्याही परिस्थितीत शिक्षकांना पेन्शन सुरू करणार नाही. आणि आता संभाजीनगरच्या सभेत त्यांनी वेगळीच टेप लावली. आता त्यांनी पलटी मारलेली आहे. वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्यावर आहे, असे अजित पवार म्हणाले.



























































