परीक्षा केंद्र संचालकांना हवी  उत्तरपत्रिका तपासणीतून सूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्राथनिधीक फोटो

दहावी, बारावी परीक्षांसाठी परीक्षा केंद्र संचालक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱया मुख्याध्यापक व शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामातून सूट हवी आहे. या मागणीचे निवेदन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.

मुंबईतील अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये दहावी, बारावी परीक्षांची केंद्रे आहेत. मुंबईतील 70 टक्के शिक्षक/ मुख्याध्यापक मुंबईबाहेरील उपनगरांत राहतात. त्यांचा बराच वेळ लोकल प्रवासात जातो.  केंद्र संचालक म्हणून नेमणूक मिळालेल्या शिक्षक/मुख्याध्यापकांना परीक्षेदिवशी सकाळी आठ वाजता शाळेत हजर राहणे आवश्यक असते. तसेच प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, परीक्षेचे नियोजन करणे आणि उत्तरपत्रिका नियोजित ठिकाणी पोहोचवणे ही कामे करावी लागतात. त्यानंतर शाळेचे नियमित वर्गही घ्यावे लागतात. या सर्व कामकाजात केंद्र संचालक सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्यस्त असतात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी किंवा समीक्षण करण्यासाठी वेळच उपलब्ध होत नाही. त्यामुळे केंद्र संचालकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम दिल्यास त्यांच्यावर कामाचा ताण निर्माण होतो. त्यात मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र संचालकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम व समीक्षकाच्या कामातून सूट देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.