चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडणार! उद्धव ठाकरेंचे तडाखेबंद भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कलानगर येथे जमलेल्या शिवसैनिकांना उद्देशून भाषण केले. त्यांनी केलेले भाषण खालीलप्रमाणे आहे.

चोर आणि चोरबाजाराच्या मालकांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. योगायोग असेल काहीही असेल, पण आज महाशिवरात्र आहे, उद्या शिवजयंती आहे. जणू काही या दिवसांचा मुहुर्त पाहून शिवसेना हे नाव चोरलं गेलं आहे. धनुष्यबाण चोरला गेला आहे. पण ज्याने चोरलाय त्याला माहिती नाहीये की त्याने मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला, मात्र मधमाशीचा डंख त्यांना लागलेला नाहीये. तो डंख मारायची वेळ आली आहे.

भाजप आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की त्यांच्या हाताशी ज्या काही त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आहेत त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील मात्र शिवसेना संपवता येणे शक्य नाही. निवजणूक आयुक्तांनी जी गुलामी काल केली आहे, कदाचित निवृत्त झाल्यानंतर त्यांना त्याबदल्यात कुठल्या तरी राज्याचे राज्यपाल होऊ शकतील. कारण आताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. हे असे सगळे गुलाम त्यांनी अवती भवती ठेवले आहेत. या गुलामांना मी आव्हान देतोय की शिवसेना कोणाचाही हे तुम्ही तुमच्या मालकाच्या आदेशाने ठरवू शकणार नाही तर महाराष्ट्रामधल्या जनतारुपी मालकाने ठरवायची वेळ आली आहे.

यांना ठाकरे नाव पाहिजे, बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे पण शिवसेनेचे कुटुंब नको आहे. आपल्यावर जेव्हा आरोप केले जात होते की मोदींचे नाव वापरून तुम्ही मते मिळवलीत, तेव्हा आमची युती होती. एकेकाळी जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होती. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतंय. ही आपल्या शिवसेनेची आणि बाळासाहेबांची ताकद आहे. आज मोदींच्या नावाने मते मिळू शकत नाहीत. मोदींनाही बाळासाहेबांचा मुखवटा घालून यावं लागतंय, हा आपला मोठा विजय आहे.

ज्या पद्धतीने शिवसेना हे नाव चोरांना दिलं गेलं. आपला पवित्र धनुष्य बाण चोरांना दिला गेला. कदाचित आपली मशाल ही निशाणीही काढून घेतील. पण माझे आव्हान आहे की , तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन निवडणुकीत उतरतो बघूया काय होतं ते. कारण धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो उताणा पडला. हे चोर आणि चोरबाजाराचे मालक हे शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही.

मी खचलेलो नाही, मी खचणार नाही, माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीतरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्या सगळ्यांना निवडणुकीत गाडून त्यांच्या छाताडावर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. कदाचित उद्या मी फेसबुक लाईव्ह करेन, आणि त्यावेळी मी निवडणूक आयोगाने आपल्याला काय सांगितलं होतं आणि आपण त्याची कशी पूर्तता केली हे मी विस्ताराने सांगेन. मग तुम्ही ठरवायचंय की कोणाचं चुकलंय.

गेल्या 75 वर्षात असं कधीही घडलं नव्हतं, अगदी काँग्रेसही तेव्हा फुटली होती, काँग्रेसचं चिन्ह गोठवलं गेलं होतं, दुसऱ्या गटाला ते दिलं नव्हतं. समाजवादी पक्षाच्या बाबतीतही समोरून दावा सोडल्याने ते चिन्ह टिकलं. जयललिता आणि जानकी रामचंद्रन यांच्यातील वाद मिटला म्हणून ते चिन्ह त्यांना मिळालं, अन्यथा असा वाद जेव्हा झाला तेव्हा कोणत्याही एका गटाला मूळ चिन्ह आणि नाव दिलेले नाही, ते या पंतप्रधानांच्या गुलाम असलेल्या निवडणूक आयुक्तांनी केले आहे.

आपली परीक्षा आहे. लढाई आता सुरू झाली आहे. माझ्या हातात आज काहीही नाही. मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. मी एवढंच सांगतोय की त्यांनी हे जे तरुण रक्त पेटवलं आहे. शिवसैनिकांचा संयम पाहिला आहे, शिवसैनिकांचा राग पाहू नका. ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याचा कालचा फोटो पाहिलात काय ? त्याचा चेहरा कसा होता ते पाहिलंत ? त्याच्या गळ्यात ‘मी चोर आहे’ अशी पाटी लटकावल्यासारखा त्याचा चेहरा होता. ही चोरी पचू द्यायची नाहीये, आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा. खांद्यावर आता पवित्र भगवा घेऊन राजकारणात हे चोर आणि त्यांच्या मालकांचा नायनाट केल्याशिवाय राहायचे नाही ही शपथ घेऊन पुढे चालूया. असेच जिवंत मनाचे, हिंमतीचे, जिद्दीचे शिवसैनिक असेपर्यंत कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपू शकत नाही.