बलात्कारानंतर 48 तासांच्या आत अल्पवयीन मुलीने दिली दहावीची परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कारानंतर 48 तास पूर्ण व्हायच्या आत एका अल्पवयीन पीडितेने आपली दहावीची परीक्षा दिली आहे. यासाठी तिला पोलिसांनी सर्वतोपरी सहकार्य करून तिच्या सुरक्षेची व्यवस्थाही केली आहे.

ही घटना बिहारच्या भोजपूर येथे घडली आहे. पीडितेची परिस्थिती अतिशय हलाखीची असून तिचे आई-वडील विविध प्रकारची मोलमजुरीची कामं करून उदरनिर्वाह करतात. शनिवारी पीडिता शौचासाठी घराबाहेर पडलेली असताना गावातील एकाने तिच्यावर अत्याचार केले. तिने या घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि तिचा जबाब नोंदवून घेतला. तिचा जबाब दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवणं गरजेचं होतं.

मात्र, तसं केल्यास तिची दहावीची परीक्षा बुडली असती. त्यामुळे पीडितेने आपल्याला दहावीच्या परीक्षेला बसण्याची इच्छा प्रकट केली. तिच्या इच्छेचा मान राखून पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांपुढील जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलली. तसंच, पीडितेच्या विनंतीवरून तिला बोर्डाच्या परीक्षेवेळी पोलीस सुरक्षाही प्रदान करण्यात आली. दरम्यान, तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीलाही पकडण्यात आलं आहे.