कर्मचारीच नव्हे रोबोटनाही कपातीचा फटका, एवढ्यांना कामावरुन काढून टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपातीचे संकट संपण्याचे नाव घेत नाहीय. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कपात केली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या कपातीचा फटका माणसाबरोबरच रोबोटलाही बसला आहे. अमेरीकेच्या टेक कंपनीने 100 रोबोटना नोकरीवरुन काढून टाकले आहे. वृत्तानुसार, अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. याआधी या कंपनीने जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट गूगलच्या एव्हरीडे रोबोट्स एक्सपेरिमेंटल एक्स लॅबोरेटरीज अंतर्गत एक युनिट होते, जे अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी बंद केले आहे. या अंतर्गत एका हात असलेल्या 100 रोबोट्सना प्रशिक्षण देण्यात आले. हे चाक असलेले रोबोट कंपनीच्या कॅफेटेरियाची साफसफाई करण्यास मदत करायचे. यापैकी बरेच रोबोट प्रोटोटाइप प्रयोगशाळेच्या बाहेर पाठवले गेले आहेत आणि ते गुगल बे परिसरामध्ये चांगले काम करत आहेत. टेबल साफ करणे, कचरा वेगळा करणे आणि रीसायकल करण्यासाठी या रोबोट्सचा वापर करण्यात आला. कोरोना काळात कॉन्फरन्स रूम स्वच्छ करण्यासाठीही या रोबोट्सची मदत घेण्यात आली होती. रोबोट डिव्हिजन बंद केल्यानंतर त्याचे तंत्रज्ञान अन्य काही विभागात वापरता येईल.

अल्फाबेटने गेल्या काही वर्षांपासून शिकण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली आहे. कंपनीला आभासी जगातून वास्तविक जगात ज्ञान हस्तांतरित करायचे आहे. रोबोट्स जगभरात लोकप्रिय होत आहेत. माणसं रोबोट्सकडून वेगवेगळी कामं करुन घेत आहेत. मशीन लर्निंग टेक्निक, रीइन्फोर्समेंट लर्निंग, प्रात्यक्षिक यासारख्या गोष्टींद्वारे हे करणे शक्य आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या  परिस्थिती  योग्य नाहीत. तोट्याचा सामना करत असलेल्या टेक कंपन्या खर्च कमी करण्यासाठी पर्याय शोधत आहेत. गुगलने कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांनाही खर्च कमी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत डेस्क शेअर करण्यास सांगितले आहे जेणेकरून ऑफिस स्पेस वाढवता येईल.