
ताडोबात दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास आहे. दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळा बिबट्याचे वास्तव्यही येथे आढळले होते. आता वन्यजीव प्रेमींना सुखावणारी आणखी एक घटना येथे घडली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील केमारा-देवई मार्गाने प्रवास करणाऱ्यांना पांढरे हरीण आढळले आहे. या पांढऱ्या हरणाचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. फोटो काढणाऱ्याने ते हरीणच असल्याचे छातीछोकपणे सांगितले आहे, मात्र फोटो अस्पष्ट असल्याने फोटोत नक्की हरीणच आहे की दुसरा प्राणी हे समोर आलेले नाही.
दोन वर्षांपूर्वी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात असेच पांढऱ्या रंगाचे हरीण आढळले होते. चंद्रपूरमध्ये पांढरे हरीण पाहिल्याचे काही लोक म्हणतात, मात्र तसा पुरावा मिळाला नाही. मात्र आता रात्रीच्या वेळेस घेण्यात आलेला एक फोटो व्हायरल होत आहे, त्यामुळे खात्री पटत नाही. परंतु असे अल्बिनोस (पांढरे ) हरीण प्रत्यक्षात असू शकते. हा जनुकीय दोष असतो.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते हजार हरिणांपैकी एकामध्ये ‘अल्बिनोस’ची लक्षणे दिसू शकतात. ‘अल्बिनिझम’ अत्यंत दुर्मिळ आहे. या हरिणांची संख्या स्वीडनच्या वेस्ट वर्मलँडमध्ये 50 च्या जवळपास आहे.
एखाद्या प्राण्याच्या शरीरात मेलेणीनचे प्रमाण कमी झाले तर तो प्राणी पांढरा दिसतो. या उलट चंद्रपूरमध्ये पिवळ्या ऐवजी काळा बिबट पाहिला आहे. हा सुद्धा जणूकीय दोषाचाच परिणाम आहे.त्यामुळे चंद्रपुर मध्ये पांढरे हरीण आढळले तर नवल वाटायला नको, अशी प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
‘त्या’ पांढऱ्या रेडकुचा मृत्यू
जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा गावातील येलमुले यांच्या मालकीच्या म्हशीने पांढऱ्या रेडकुला जन्म दिला. हा रेडकू कुतूहलाचा विषय ठरला होता. मात्र तीन दिवसातच त्याचा मृत्यू झाला.



























































