
अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही. हे आपल्या राजकीय सुडापोटी जिह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणाऱयांनी लक्षात ठेवावे. आमच्या संयमाचा अंत बघू नका, तुमच्या दहशतीचे झाकण उडवायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्रकार परिषदेतून दिला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, नगर जिह्यात विद्यमान पालकमंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जाते आहे. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. आपल्या चेल्याचपाटय़ांना हाताशी धरून अधिकारी आणि पंत्राटदारांना धमकावले जात आहे. कामे बंद पाडली जात आहेत. चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारी बैठकांमध्ये, सार्वजनिकरीत्या अपमानित करून धमकावले जात आहे. पालकमंत्र्यांनी संगमनेर येथे जल जीवन मिशनच्या कामांची आढावा बैठक आयोजित केली होती. 2019 ते 2022 या कार्यकाळात मंजूर केलेली कामे बंद पाडणे हाच या बैठकीचा हेतू होता. ज्यांना स्वतःच्या तालुक्यातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, हे संगमनेरला येऊन बैठका घेतात आणि कामे बंद पाडतात हे हास्यास्पद आहे. पूर्वीपासूनच संगमनेर तालुक्याचा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत आहे, असे थोरात म्हणाले.



























































