
श्रीगोंदा तालुक्यातील दूधभेसळप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी यापूर्वी दोनजणांवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपींची संख्या सहावर गेली असून, मुख्य आरोपी अद्यापि फरार आहे.
वैभव रामदास राऊत, संदीप बबन राऊत (दोघे रा. बोरुडेवाडी), दीपक मखरे, नीलेश तुकाराम मखरे (दोघे रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप मखरे (रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा) याला आधीच अटक केलेली असून, बाळासाहेब बाबूराव पाचपुते (रा. काष्टी) हा फरार आहे. अन्नसुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. घातक रसायनांचा वापर करून दूध बनविण्याचा गोरखधंदा अन्न व औषध प्रशासनाने काष्टी येथील वांगदरी रस्त्याच्या कडेला राहणाऱया बाळासाहेब पाचपुते याच्या घरी छापा टाकून उघडकीस आणला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 17 मार्च रोजी पाचपुते आणि मखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आणखी चारजणांचा समावेश झाला आहे. वैभव राऊत, संदीप राऊत, दीपक मखरे, नीलेश मखरे यांनाही अटक करण्यात आली आहे.
दूधसंकलन आले निम्म्यावर
दूधभेसळ प्रकरणात श्रीगोंद्यातील रॅकेट उघडकीस आल्याने तालुक्यातून दररोज होणारे एक लाख 60 हजार लिटर दूधसंकलन छापा पडल्यापासून 70 हजार लिटरवर आले आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात रोज 90 हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार होऊन तालुक्यातील डेअरीला जात होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.



























































