
>> अरुण जोशी
‘माझ्या मनात विनिते, नाव गं कसं सांगू? अमोल त्याचा भाव गं!’ असं एक अतिशय गोड भावगीत रेडिओवरून कानी पडायचं. या गीताच्या गायिका आहेत जानकी अय्यर. आता या नावाने नेटवर माहिती मिळवायला गेले तर नव्या पिढीची जानकी अय्यर नावाची गायिका आणि तिची गाणी झळकतात. पण ‘माझ्या मनात..’ गाणाऱ्या जानकीताईंची समग्र माहिती मला तरी सापडली नाही. पूर्वी केव्हा तरी एका पुस्तकात अशा ठराविक गाण्यांमधून लोकप्रिय झालेल्या मोहनतारा अजिंक्य, उषा अत्रे, उषा टिमोथी अशा अनेक गायिकांची तसंच काही लोकप्रिय गाणी गायिलेली, पण आता कदाचित प्रसिद्धीच्या वलयाबाहेर असलेल्या रतिलाल भावसार, अरविंद पिळगावकर यांचेही नाद-मराठी वाचल्याचे स्मरतात. ज्या अमराठी गायकांनी मराठीत गायिलं त्यांची माहिती आपण प्राधान्याने घेत आलो. यापैकी काही गायक-गायिकांची गाणी ते इथेच महाराष्ट्रात असल्यामुळे ध्वनिमुद्रित झाली तर रफी, किशोर, मुकेश यांची गीतं काही मराठी संगीतकारांनी आवर्जून गाऊन घेतली. मुकेश यांचं ‘सप्तपदी’ चित्रपटातलं ‘एकदा येऊन जा…’ हे एकदाच गायिलेलं मराठी गीत असावं, कारण दुसरं आढळलं नाही.
जानकी अय्यर पुण्यातच राहत असल्याने त्यांचा गजानन वाटवे यांच्याशी चांगला परिचय होता. त्यांची काही गाणी गोविंद पोवळे यांनीही संगीतबद्ध केली. याहून खूप माहिती मिळाली नाही. त्या काळातले संदर्भ सांगणारेही आता कमीच. एका पुस्तकात या काळातल्या अनेक भावगीत गायिकांचा उत्तम परिचय करून देण्यात आला होता. ते पुस्तक वाचल्याचं आठवतं, पण नेमकं नाव आठवत नाही.
जानकी अय्यर यांचा स्वर अतिशय गोड. मालती पांडे यांची गाणी जशी घराघरात पोचून गुणगुणली जाऊ लागली. तसंच जानकीताईंच्या गाण्याचं त्या काळात झालं. त्याकाळी एखाद्या महिला मंडळातल्या गाण्याच्या भेंडय़ा मालतीबाईंचं ‘खेडय़ामधले घर कौलारू’ किंवा माणिक वर्मांचं ‘उघड नयन देवा’ आणि जानकी अय्यर यांचं ‘माझ्या मनात विणिते नाव गं’ अशा गाण्यांनी रंगायच्या. लता-आशाची विलक्षण प्रतिभेची गाणी आपल्या आवाक्यातली नाहीत असं वाटणाऱ्या सुरेल गळय़ांनाही खूप कमी गीतं गाणाऱ्या गायिकांची गाणी मोहून टाकायची.
रेडिओ हे त्या काळातलं मनोरंजनाचं एकमेव सर्वोत्कृष्ट साधन होतं. (खरं तर आजही आहे… पण ऐकतात किती?) सकाळची ‘मंगल प्रभात’मधली गाणी अकरा वाजता ‘कामगार सभे’तली गीतं आणि रात्री ‘आपली आवड’मधली रसिकांच्या आवडीची गाणी ऐकून त्यावर ‘तुम्ही परवाचा तो कार्यक्रम ऐकला की नाही…?’ वगैरे चर्चा व्हायची. रेडिओने अनेकांना कानसेन केलं. स्वरवैविध्याचे अनेक आविष्कार त्यातून नकळत मनात रुजले. जानकी अय्यर यांचं आणखी एक प्रसिद्ध गीत बऱ्याच जणांना आठवेल. ‘परदेशी सजण घरी आले, देहताप सरले, सुखमय मी मंगल गीत म्हणाले’ या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या गाण्याचं संगीत आहे गजानन वाटवे यांचं. हासुद्धा एक दुर्मिळ योगच.
गजानन वाटवे स्वतः गायक-संगीतकार. अनेक गाणी, कविता निवडून ते चाली ‘बांधत.’ त्या कुणालाही सहज गुणगुणता येण्यासारख्या. जानकी अय्यर यांच्या दोन स्फूर्तिगीतांनाही त्यांनी संगीत दिलं. त्यातलं एक गीत छत्रपती शिवरायांच्या जन्माचं आणि दुसरं त्यांच्या राज्याभिषेकाचं. दोन्ही गाणी लिहिली श्रीराम आठवले यांनी.
शिवजन्माच्या गीतामध्ये आठवले लिहितात-
‘जा पवना जा वेगे, मिरव जनी वार्ता, शिवनेरीवर घेत जन्म, शुभयोगे शककर्ता सरली नैराश्यनिशा, उजळल्या दाही दिशा, पूर्व क्षितिजे येत अरुण, देत अभय शिवभक्ता’
तर शिवराज्याभिषेकाचं गाणं असं-
‘रायगडी शिंग नभी, उच्चस्वरे घोष करी, कलियुगात अवतरले, रामराज्य भुवरी’
हे जानकी अय्यर यांचं सहगान आहे.
सूर्यकांत खांडेकर यांचं विजय करंदीकर यांनी संगीत दिलेलं गाणं ‘मी अशी होऊनि वेडी पत्र पहिले वाचते, सावळे गं रूप त्यांचे माझ्या मनी खेळते.’ त्याचप्रमाणे योगेश्वर अभ्यंकरांच्या शब्दांना गोविंद पोवळे यांनी संगीतबद्ध केलेलं जानकी अय्यर यांचं गाणंही खूप प्रसिद्ध आहे. ‘गोदातीरी माझ्या इथल्या, प्रभुजी अवतरले, उमटली रामाची पाऊले.’
या आणि अशा मोजक्या गोड गाण्यांमधून जानकी अय्यर यांनी एका पिढीच्या मनात स्थान मिळवलं. मराठीत गाणारे असे आणखी अनेक अमराठी गायक-गायिका असतील. अलीकडच्या काळात तर संगीत स्पर्धांमधून आलेल्या तरुण गायक-गायिका काही मराठी गाणी म्हणतात. काहीजण लता-आशा या आख्यायिका ठरलेल्या गायिकांची गीतं आदरपूर्वक सादर करतात.
काही हिंदी गाण्यांच्या चाली आवडल्यामुळे त्यावर आधारित मराठी गाणीही आलेली आहेत. एका मराठी गाण्यावरूनच तितकंच प्रसिद्ध मराठी गीत आल्याचीही उदाहरणं आहेत. काही लोकप्रिय गाणी दोन किंवा तीन लोकप्रिय गायक-गायिकांनी गायिलेली आहेत. अनेक गाणी श्रोत्यांना आठवतात, पण गीतकार, संगीतकार ठाऊक नसतात असंही घडतं.
काही गीतकार, संगीतकार, गायक-गायिका यांचा एक ठसा जनमानसात असतो त्यापेक्षा त्यांची अगदी वेगळय़ा धर्तीची गीतंही असतात. मराठीच्या ‘नादा’मध्ये हेसुद्धा सर्व येतंच. कारण आपल्याही मनात ‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट’ असे भाव असतात आणि असायलाच हवेत. अशाच काही निवडक गीत, संगीत आणि स्वरांचा थोडक्यात परिचय पुढे करून घेऊ.



























































