
सोशल मीडियावर हिंदुस्थानी खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह स्टेटमंट स्टंट करून चर्चेत राहण्याचा पाकिस्तानी फंडा अष्टपैलू अब्दुल रझ्झाकच्या अंगलट आला आहे. हार्दिक पंडय़ा कपिलदेवच्या आसपासही नाही अशी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱया रझ्झाकला अक्षरशः झोडून काढले आहे. सोशल मीडियावर ट्रोल होताच त्याला या प्रतिक्रियेवर सारवासारव करणारी दुसरी प्रतिक्रियाही देणे भाग पडले आहे.
सोशल मीडियावर रझ्झाकने हार्दिक पंडय़ाची तुलना करणारी प्रतिक्रिया देताच त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. मग त्याला आपली बाजू मांडण्यासाठी एका न्यूज पोर्टलचा सहारा घ्यावा लागला आणि त्या पोर्टलवर त्याने दिलेल्या मुलाखतीत नेहमीचेच राग आळवले. पंडय़ावर दिलेल्या प्रतिक्रियेचा लोकांनी गैरअर्थ काढला. मला हे म्हणायचे नव्हते. एक क्रिकेटपटू म्हणून मी पंडय़ाला इतकंच म्हणालो होतो की, त्याला स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल. जे खेळाडू हिंदुस्थान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आहेत त्यांच्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया जाणूनबुजून केलेली नाही. मी केवळ एक खेळाडू म्हणून व्यक्त झालोय. जर कपिलदेव मला सल्ला देऊ इच्छितात, तर मी त्यांच्या प्रतिक्रियेला सकारात्मकरीत्या घेईन. पंडय़ाला काही गोष्टींवर निश्चितच काम करावे लागेल. मग ते त्याच्या पायांची हालचाल असो किंवा बॅटची हालचाल असो किंवा गोलंदाजीपूर्वी तो चेंडूकडे कसे पाहतो हे असो. माझ्या बोलण्याचा इतकाच अर्थ होता. एक अष्टपैलू म्हणून मला हार्दिकला हाच सल्ला द्यायचा होता, पण लोकांनी अर्थाचा अनर्थ केला आणि माझ्यावर टीकाही केली, असे स्पष्टीकरण रझ्झाकने आपल्या मुलाखतीत केले. रझ्झाकने यापूर्वी जसप्रीत बुमराहवरही टीका केली होती.



























































