
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शार्टसर्किटमुळे आग लागून कपडय़ांचे दुकान व जनरल स्टोअर्स जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (31 रोजी) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
टाकळीभान-घोगरगाव रोडलगत पोस्ट ऑफिससमोर अशोक तऱहाळ यांचे ‘आनंद जनरल स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. या जनरल स्टोअर्सशेजारीच गणेश महावीर सिद्धेश्वर यांचे कपडय़ांचे गोडाऊन आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही दुकानदार दुकान बंद करून घरी गेले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणा ऱ्या ओंकार जंगम यांना दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांना बाहेर येण्यासाठी पत्र्याचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता, त्या शटरमध्ये विद्युतप्रवाह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते मागील दरवाजाने बाहेर गेले व आरोग्य केंद्राच्या भिंतीवरून खाली उतरून आले.
त्यानंतर त्यांनी ही घटना नानासाहेब बोडखे यांना सांगितल्यावर बोडखे यांनी त्वरित तऱहाळ व सिद्धेश्वर यांना माहिती दिली. बातमी समजतात या दोन्ही दुकानदारांनी दुकानाकडे धाव घेतली. दरम्यान, शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले. मात्र, आतमध्ये लागलेल्या आगीमुळे या दुकानांचे शटर उघडण्यास अडचण येत होती. त्यामुळे ट्रक्टरच्या मदतीने शटर बाजूला करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. दरम्यान, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात येऊन आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्ही दुकानांतील वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.
या आगीत अशोक तऱहाळ यांच्या ‘आनंद जनरल स्टोअर्स’मधील माल जळून खाक झाला. तसेच गणेश महावीर सिद्धेश्वर यांच्या दुकानातील माल आगीत जळाला. सकाळी ‘महावितरण’चे सहायक अभियंता वैभव निकम, वरिष्ठ तंत्रज्ञ कैलास घोळवे व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.



























































