
कर्जाला कंटाळून दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पारगावात घडली आहे. विनायक पाटील, बाबासाहेब मोरे (दोघे रा. बीरदेवनगर, पारगाव, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत.
विनायक पाटील यांचा चिरा ओढण्याचा व्यवसाय असून, दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणत व त्याची विक्री करीत होते. बाबासाहेब मोरे हा त्याला सहकार्य करायचा. बाबासाहेबचा शेती व्यवसाय व जनावरांचा गोठा असून, दोघांवरही मोठय़ा प्रमाणात कर्जाचा डोंगर होता. आर्थिक चणचण व कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी पारगाव येथील वारणा तात्यासाहेब कोरे मिलिटरी ऍकॅडमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली.
विनायक यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असून, बाबासाहेब मोरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पारगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यूं’ची नोंद करण्यात आली असून, जावेद रोटीवाले, रणवीर जाधव तपास करीत आहेत.
























































