
पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वर उसळली. कमाल तापमान 37, तर किमान तापमान 26 अंशांवर गेले. त्यामुळे मुंबईकरांची दुपारी उन्हातून चालताना प्रचंड दमछाक झाली. पुढील दोन दिवसांत तर उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल, पारा 39 ते 40 अंशांवर झेपावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) काही दिवसांपूर्वीच उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्या लाटेची धग मुंबईकरांनी सोमवारी संपूर्ण दिवसभर अनुभवली. सांताक्रुझमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक म्हणजेच 26 अंश इतके नोंद झाले, तर कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांची मोठी वाढ होऊन ते 37 अंशांवर गेले. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांच्या आसपास गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या.
दोन दिवस घामाचे
पुढील दोन दिवस उष्णता आणखी वाढेल, पारा 40 अंशांवर जाईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. ठाणे, रायगड, पालघर या जिह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.































































