
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. बहुचर्चित अयोद्धा दौरा करून मुंबईत परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी तातडीने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या परस्थितीची पाहाणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. रविवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
शेतकरी आता कुठेतरी सावरत असताना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी अनेक जिल्ह्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथाच मांडली आहे. तसेच, प्रभू रामांच दर्शन खुशाल घ्या, पण रामराज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडेही लक्ष द्या, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
अवकाळी आणि गारपीटीमुळे राज्यात कांदा, द्राक्षे, पेरु, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तळाहाताच्या फोडासारखं शेतकरी आपलं पीक जपतो, पण निसर्गापुढे त्याचं काहीही चालत नाही. एका फटक्यात होत्याचं नव्हतं होतं. आज एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ झाला आहे, असे म्हणत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यायचे तर त्यांनी खुशाल घ्यावे. मात्र, राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत निर्णयापेक्षा सर्वांसाठी कर्तव्य श्रेष्ठ असतात. प्रभू रामचंद्रांनीही प्रजेला तळहातातील फोडासारखं जपलं म्हणून जनता आजही म्हणतेय रामाचं राज्य आलं पाहिजे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, असे म्हणत राजू शेट्टी यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तसेच, या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहनही केलंय.



























































