सोलापुरात अनेक झाडे उन्मळून पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायंकाळी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेच्या तारा तुटल्या आहेत. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याचे सर्वत्र चित्र होते. जिह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, यात द्राक्ष, आंबा, केळीच्या बागांसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अभिमानश्री नगर येथे वीज पडून तीन घरांचे नुकसान झाले, तर कुमठा नाक्याजवळ एका विटभट्टी कामगाराचा मृत्यू झाला.

देवेंद्र सौरप्पा गायकवाड (वय 21, रा. हुडको कॉलनी) असे मृत कामगाराचे नाव आहे.

सोलापूरसह अनेक भागांत हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. शहरात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग यायचे; परंतु पाऊस मात्र पडत नव्हता. शुक्रवारी साडेचार ते पाच दरम्यान अचानकपणे वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास पावसाचा तडाखा सुरू होता. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली काही झाडे उन्मळून पडली, तर विजेच्या तारा तुटून वीज खंडित झाली. जुना एप्लॉयमेंट चौकात एका कारवर झाड पडले. तर, वाडिया हॉस्पिटलजवळ विजेचे खांब पडून वीज खंडित झाली होती. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर झाड पडले. कुंभारवेस, सम्राट चौक, शिवाजी चौकसह अनेक सखल भागांत आणि रस्त्यावर पाणी साचले होते.

मोहोळ तालुक्यामध्ये पावसाने द्राक्ष, आंबा बागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील मोहोळ, रामहिंगणी, गोटेवाडी, शेटफळ, हिवरे, चिखली या गावांमध्ये पाऊस झाला. करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरातील अनेक गावांत दुपारी अवकाळी पावसाने थैमान घातले असून, या पावसाचा सर्वाधिक फटका केळी उत्पादकांना बसला आहे.