
>> विनायक
आज आपण आधुनिक विज्ञानाचा, त्यातील संशोधनाचा वापर ठायी ठायी करतो. दिवसाकाठी किती यंत्रांशी आपला संबंध येतो हे आपल्या लक्षातही येत नसेल. किती किती गोष्टींनी आपलं आधुनिक जीवन व्यापलं आहे याचा कधी निवांतपणे विचार केलात तर यादी खूSSप मोठी होईल. अगदी आत्ता लेख ज्याने लिहितोय ते बॉलपेन हीसुद्धा संशोधित लेखणी आहे.
याचा पाया घातला तो अगदी इसवी सनापूर्वीपासून विज्ञानाचा विचार करणाऱ्या विचारवंत संशोधकांनी. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी आपल्याकडे कणाद ज्यावेळी ‘कण’ (पार्टिकल) या गोष्टीचा विचार करत होते, त्याच काळाच्या आगेमागे इ. स. पूर्व 287 मध्ये सिसिली या त्यावेळच्या ग्रीक साम्राज्यात राहणारा आर्किमिडेस नावाचा तरुण अव्याहत संशोधनात गुंतला होता.
त्याच्याबद्दलची एकच गोष्ट बालवयापासून आपल्याला ठाऊक असते, ती त्याच्या ‘युरेका’ या उद्गाराची. आर्किमिडेस संशोधक असल्याचं ठाऊक असल्याने त्यावेळच्या हेरो या राजाने त्याला एक सोन्याचा मुकुट दाखवून यात काही अन्य धातू मिसळलेला आहे का? याची परीक्षा करायला सांगितलं. मुकुटाला धक्का न लावता ते काम कसं करावं याचा विचार करतच आंघोळीला गेलेल्या आर्किमिडेसने पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये प्रवेश करताच आंबळून आलेलं पाणी एकदम बाहेर पडलं आणि आर्किमिडेस संशोधन ‘साक्षात्कार’ झाल्यासारखा ‘‘युरेका… युरेका…’’ (सापडलं, उत्तर सापडलं) असं म्हणत धावत सुटला अशी कथा. ती खरी की काल्पनिक ते ठाऊक नाही, पण राजाने देवासाठी बनवून घेतलेल्या मुकुटाच्या सोन्याच्या वजनात याच ‘प्रयोगा’द्वारे थोडी कमतरता असल्याचं स्पष्ट झालं. ‘बॉयन्सी’ म्हणजे पाणी बुडवलेल्या वस्तूला प्रतिरोध करणारं बळ वापरतं तेव्हा बुडवलेल्या वस्तूच्या वजनाइतकं पाणी फेकलं जातं. छोटय़ा, पण पाण्याने काठोकाठ भरलेल्या पसरट भांडय़ात मुकुट सोडताच जेवढं पाणी बाहेर पडलं ते आणि राजाने या कारागीरीसाठी दिलेल्या सोन्याच्या वजनात फरक असल्याचं लक्षात आलं. यावरून वजनाने सोन्याहून हलकी असणारी चांदी त्यात मिसळल्याचं सिद्ध झालं. आर्किमिडेसचा प्रयोग यशस्वी ठरला.
आर्किमिडेस ग्रीक साम्राज्यातील सिसिलीचा असला तरी त्याचं विद्यापीठातलं शिक्षण त्या काळी ज्ञान-विज्ञानासाठी मध्यपूर्वेत प्रसिद्ध असलेल्या इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रिया इथे झालं. तिथल्या जगप्रसिद्ध ग्रंथालयाचा प्रमुख असलेला इरॅटॉस्थेनिस आर्किमिडेसचा मित्र झाला. या दोघांची पत्रे नंतर उपलब्ध झाली. या ग्रंथातील ग्रंथसंग्रहाची तुलना आपल्याकडच्या नालंदा किंवा तक्षशिला (आता तक्षिला) येथील प्राचीन विद्यापीठांशी करता येईल. इजिप्तमध्ये तेव्हा वापरात असलेला नाइल नदीचं पाणी वर खेचणारा तिरका पंप त्याने पाहिला असावा. त्यात सुधारणा करून एका पाइपात ‘क्रू’च्या आटय़ांप्रमाणे चकत्यांचे आटे असलेला दांडा बसवून त्याद्वारे खालच्या पातळीवरचं पाणी वर खेचता येणारे ‘स्कू’ (म्हणजेच ते पंप) आर्किमिडेसने ग्रीसमध्ये परतल्यावर प्रचलित केले. आपल्याकडील दागिन्यांमध्ये कानात घालण्याची कुडी अथवा हातात घालायचे (उघडणारे) मोत्याचे तोडे अशाच ‘क्रू’ किंवा ‘मळसूत्रा’ने घट्ट केले जायचे. मात्र ‘स्कू’ किंवा ‘मळसूत्र’ इतरत्र वापरलं का गेलं नाही? असा प्रश्न पडतो.
कॅल्क्युलस किंवा कलन शास्त्राचा विचार आर्किमिडेसने केला असं म्हटलं जातं. ‘गणकयंत्रा’द्वारे गणन तंत्र वापरणं हे पूर्वीपासून मण्यांच्या ‘ऍबॅकस’च्या वापरातून लोकांना ठाऊक होतंच. आमच्या लहानपणी दगडी पाटीच्या अर्ध्या भागात अंक मोजण्यासाठी मण्यांच्या दोन-तीन ओळी लावलेल्या पाटय़ाही मिळत असत. तेच ‘ऍबॅकस’.
आर्किमिडेसने लिव्हर (lever) किंवा ‘तरफ’ या गोष्टीचा विचार केला. ‘‘मला अंतराळात बसायला जागा आणि प्रचंड लांब तरफेसारखी फळी मिळाली तर हा पृथ्वीचा गोळाही उलथवून दाखवीन’’ इतपत त्याचा आत्मविश्वास वाढला असल्याचे ही गोष्ट दर्शवते. त्यात तथ्य किती ते कोण सांगणार, पण तरफ आणि अनेक कप्प्यांचा (पुलीचं चाक) वापर करून जड वस्तू सहज हलवता, उचलता येणारी यारी त्यातूनच नंतर अस्तित्वात आली. अशाच प्रकारची यारी (क्रेन) बोटीवर बसवून आणि त्याच्या लांब ‘हाता’ने फेकलेला एक हूक शत्रूच्या बोटीला अडकवून ती बोट उलटून टाकणारी यंत्रणा आणि अतिअंतर्वक्र आरसे बोटीवर बसवून सूर्याच्या प्रखर किरणांनी शत्रूच्या बोटींचा पत्रा वितळवणारी ‘वॉर मशीन’ त्याने बनवली. मोठय़ा बेचकीसारख्या यंत्राने शत्रूवर गोळाफेक करण्याचं तंत्र रोमन सैनिकांना हैराण करत असे. कालांतराने ग्रीस-रोमन युद्धात रोमन सेनापती मॅसेलस याने आर्किमेडिसला मारू नका, असा आदेश दिला होता, पण रोमन सैनिक पकडायला आले तेव्हा त्यांची सावली पाहूनच तो ओरडला, ‘‘माझ्या गणिती अभ्यासात व्यत्यय आणू नका’’ आणि चिडलेल्या सैनिकांनी त्याला ठार केलं. वयाच्या 75 व्या वर्षी या महान शास्त्रज्ञाचा असा दुःखद अंत झाला. त्याचं चरित्र त्याचा मित्र हेरॉक्लिडेस याने लिहिले होतं, पण तेही हरवलं आणि ‘युरेका’ची गोष्ट तेवढी सामान्यांच्या लक्षात राहिली. मात्र या शास्त्रज्ञाचं योगदान त्या काळाच्या कितीतरी पुढे होतं.


























































