पारावरच्या सावल्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

नेहमीच्या सरळ वाटेवरून चालता चालता कधी कधी मन खूप थकतं आणि कुठेतरी सावली शोधू लागतं. एका वळणावर आल्यावर एक मोठय़ा वटवृक्षाच्या पाराकडे लक्ष जातं. पावलं चालायची थांबतात आणि त्या विशाल वटवृक्षाच्या पारावर येऊन बसतो. असंच काहीसं झालं आहे माझ्या मनाचं. सावली शोधत असताना एका निवांत दुपारी त्या पारावर येऊन बसल्यावर मन शांत होतं.

दुपारची शांत वेळ, डोक्यावरून हळूहळू पश्चिमेला झुकत जाणारा सूर्य, अधेमधे मनाला गारवा देऊन जाणारा कुंद वारा, हे सगळं वातावरण मनाला खूप काही देऊन जातं. जसजसा सूर्य मावळत जातो तसतशा काही आठवणी भोवताली जमा होऊ लागतात आणि अचानकपणे माझा भूतकाळ माझ्या समोर नकळतपणे येऊन उभा राहिला. ज्याची मनाने कल्पनासुध्दा केली नव्हती. कधी कधी काही अनाकलनीय घटना आपल्यासमोर घेऊन नियती येते आणी मन पुन्हा सैरावैरा धावू लागतं. गतकाळाच्या पाऊलखुणा शोधत जुन्या वाटेवर जाऊ लागतं. मला एक कळत नाही की, भूतकाळ माझा पाठलाग करतोय की मी भूतकाळाच्या मागे जातोय? मनात याच प्रश्नांचा गुंता असतो आणि अंतरी काहूर माजलेलं असतं. ज्या गोष्टींना आपण मनाच्या एका कप्प्यात बंदिस्त करून तो कप्पा कायमचा बंद केलेला असतो तोच नेमका उघडला जातो आणि सगळ्या जुन्या आठवणी अगदी नव्या आठवणीप्रमाणे कोऱया करकरीत वाटतात. एकेक आठवण मला भेटायला जमा झाली पारावर आणि बघता बघता संध्याकाळ कधी झाली ते समजलं नाही. दूर दूर जायचं होतं, पण मन आता इथून जायला तयार नव्हतं. कारण त्याला कधी एकेकाळी खूप सुखद आणि तरल क्षण गवसले होते. खिन्न, उदासीन झालेलं मन आता पुन्हा सगळ्या जुन्या सावल्यांशी खेळू लागलं आहे. जुन्या विरून गेलेल्या आठवणी आणि हरवलेले दिवस यांचा मला काहीच त्रास झाला नाही असा विचार तर या सावल्या करत नसतील ना. या सावल्यांना एकच सांगायचं आहे की, भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानात जगत असलो तरी माझा भूतकाळ मी कधीच विसरलो नव्हतो आणि विसरणारसुध्दा नाही.

माणसं जरी वेगवेगळी झाली आणि दूर दूर असली तरी नाती मात्र टिकून असतात. त्याला कारणीभूत फक्त आठवणीच असतात. कारण माणसाला माणसाचा लळा असो वा नसो, पण आठवणींना आठवणींचा लळा असतोच असतो. म्हणून त्या कधीतरी शोध घेतातच त्यांच्या जुन्या सवंगडय़ांचा. मग एक-एक अव्यक्त प्रश्न बोलू लागतात आणि त्यांची राहून गेलेली उत्तरं आपल्या मनाला मिळतात. मन हळूहळू मोकळं होऊ लागतं. किती दिवस मनात कोंडून ठेवलेल्या प्रश्नांच्या ओझ्यातून आपण मुक्त होऊ लागतो. एकेका प्रश्नाची उकल होत गेली की, आता मनात कोणतेही अस्वस्थ करणारे प्रश्न नाहीत या विचाराने मन खूप प्रसन्न होतं. अधुऱया राहिलेल्या काही गोष्टी अधुऱया राहण्यात जास्त फायदा होता हेसुध्दा मनाला आता पटतं. आपल्याला हवं तसं आयुष्य आपल्या मनात सजवत असतो, पण आपल्या मनाला काय हवं काय नको याचा विचार तो परमेश्वरसुध्दा करत असतो. हव्या त्याच गोष्टी देऊन तो काही गोष्टी हिरावून घेतो. त्याला आपल्याला त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं होतं हे मला आता या आठवणींशी गप्पा मारल्यावर उमगलं. आता या भूतकाळातील सावल्यांना माझ्या वर्तमानात माझ्या सोबत राहून येणाऱया उज्ज्वल भविष्यकाळाच्या वाटेवर चालत जायचं आहे. भूतकाळाला आपण कुणाचा तरी एक अवस्थ करणारा भूतकाळ बनण्यापेक्षा त्याच मनाचा सुंदर वर्तमान होऊन भविष्य उज्ज्वल करायचं आहे.

भूतकाळातील अंधार हळूहळू कमी होऊन वर्तमानात प्रकाश होऊन पसरला. पुढे येणाऱया नव्या आयुष्यात तोच सुखाचे नवे कवडसे घेऊन येईल ही आशा मनाला वाटू लागली होती. आठवणींशी बोलता बोलता कातरवेळ झाली आणि एक छानसा दिवा या वटवृक्षाच्या पारावर प्रज्वलित करून मी पुढच्या प्रवासाला निघालो. वातावरणातील अंधार आणि त्या दिव्याचा मंद उजेड नव्या आशेचे किरण दाखवत होता. आपलं आयुष्यसुध्दा या वटवृक्षासारखं असतं… दूरवर पसरलेलं… खोल अथांग मनासारखं… आणि या वडाची अगणित पानं म्हणजे आपल्याला आयुष्याच्या वाटेवर भेटणारी माणसं. या पारंब्या म्हणजे मनाच्या अंगणातील आठवणींचे झुले… निवांत संध्याकाळी आपल्या मनाभोवती कधीतरी जमा होणाऱया आठवणी म्हणजे पारावरच्या सावल्या…

[email protected]