
कोरोनाच्या काळात बिग बॉसचा ओटीटी सिझन चांगलाच गाजला होता. बिग बॉसच्या टेलिव्हिजन अवतारानंतर हा ऑनलाईन अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. त्यामुळे आता बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण, या सिझनमधून कार्यक्रमाचा होस्ट करण जोहर याचा पत्ता कट झाला आहे.
बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचं सूत्रसंचालन करण जोहर करणार नसल्याने पुन्हा एकदा ही जबाबदारी बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानकडे देण्यात येऊ शकते. मे महिन्याच्या अखेरीला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या सिझनची सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. हा सिझन प्रेक्षकांना कलर्सच्या व्हूट या ओटीटी अॅपवर पाहता येईल.
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात उर्फी जावेद, जिशान खान, प्रतीक सेहजपाल, नेहा भसीन, शमिता शेट्टी, दिव्या अगरवाल, राकेश बापट, मुस जट्टाना असे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पर्वाची विजेती दिव्या अगरवाल ठरली होती. ओटीटीच्या काही स्पर्धकांना पुढे बिग बॉसच्या पंधराव्या सिझनमध्ये प्रवेश मिळाला होता. आता या सिझनची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.


























































