विशेष – संपूर्णत्वाची निर्माती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गौरी सरनाईक

आई ही आपल्या संपूर्णत्वाची निर्माती असते. आपले सर्वस्व… आणि आपणही तिचे सर्वस्व असतो. ही सामान्यांची बाब झाली. ाढांतिकारक आणि शहिदांनी तर या मातृभावनेला सर्वंकष केलं. आभाळाचा ‘आ’ आणि ईश्वराची ‘ई’ या या दोन अक्षरांपासून ‘आई’ हा शब्द तयार झाला. त्याची व्यापकता या अक्षरांपासूनच कळून येते.  एक अकृत्रिम प्रेमाची, अपेक्षारहित त्यागाची अनमोल भेट ईश्वरानं मानवाला दिलेली आहे. इतिहासात, पुराणात काही माता आहेत, ज्या जगरहाटीपेक्षा वेगळ्या वागल्या; पण त्यातून जगप्रसिद्ध, माननीय, पूजनीय समाजाला आदर्श वाटणारी व्यक्तिमत्त्वं घडली.

आज तेरवी झाली. उद्या उदकशांत आणि परवा? तुम्ही तुमच्या दैनंदिन कामकाजाला मोकळे होऊ शकता, असं गुरूजी म्हणाले. खरंच असं मोकळं होता येतं का? इतक्या वर्षांचा संबंध, इतका निकटचा संबंध फक्त संपतो? की जिच्यामुळे माझ्या अस्तित्वाची ओळख झाली, जिच्यामुळे ही सुंदर दुनिया मी पाहू शकलो, तिच्या बंधनातून 13 दिवसांत मोकळं होता येतं का? जिनं मला पहिला श्वास घेवविला, जिनं माझ्या अस्तित्वाची जाणीव कधीतरी ऐन मध्यरात्री, उत्तररात्री किंवा पहाटवाऱ्याच्या संगतीनं बाबांच्या कानात सांगितली असेल, तिच्या रक्तामांसावर मी वाढलो, माझ्या दुखण्यात, आजारपणात जिनं रात्री जागवल्या असतील, तिच्या ऋणातून मी 15 दिवसांत मुक्त होणार! माझ्या श्वासात जिचं भरलेपण आहे, तिच्यातून मी असं स्वतला मोकळं करून घेऊ? अनेक विचार, अनेक भावना मनात उचंबळून आल्यात. कोठून आठवू तिला? कोठून विसरू तिला? मन गलबलून गेलंय. मधमाश्यांच्या मोहोळांसारखं घमघमलंय तिच्या आठवणींनी! तिच्या असण्या-नसण्याच्या तरल जाणिवेनं!

40-45 वर्षांच्या माझ्या आयुष्यात ती इतकी भिनलीय की, तिच्यातून मला वेगळं होणं अशक्यप्राय आहे. ही खिडकी जिच्यामध्ये मी उभा आहे, सरळ नजर मिळवली तर अलीकडच्या वळणापर्यंत नजर पोहोचते. ती अशीच उभी राहायची माझी वाट पाहत. म्हणायची, वळणावरून मी तुला ओळखायची. एखाद्या दगडाला पायानं उडवीत चालणारा मुलगा माझ्याशिवाय कोणाचा असूच शकत नाही! कारण तिला ही सवय होती. वळणावरील दगडसुद्धा ओळखीचे झाले होते.

आठवणी पण ना अशा असतात, त्यांच्यावर स्वतला झोकून दिले की, आपण आपले राहत नाही. बाबा परगावी गेल्यावर पावसात भिजताना आम्ही सोबत असायचो. भिजल्या पदराने ती माझं डोकं पुसायची. मी पण पुसू द्यायचो. थोडय़ा वेळानं लक्षात आलं की, धुम्म हसायचो. आजही माझ्याही नकळत मी हसलो. खांद्याला हलकेच स्पर्श करत बाबा म्हणाले,“का रे, का हसलास?” नकळत आईची ही आठवण मी त्यांना शेअर केली. ते पण मोकळ्या मनाने हसले. “हो रे, खरंच, ती अशीच होती. आपल्या सोबत सर्वांनाच वाहत न्यायची. आपल्यात सामावून घ्यायची.” मी चमकून बाबांकडे पाहिलं… इतके तटस्थ, अबोल आणि आत्ममग्न बाबा. आईच्या अशा आठवणींशी परिचित होते! त्यांना निरखत होतो! त्या प्रौढ चेहऱ्यावर, तरुणपणीच्या आईच्या सहवासातील कितीतरी वासंतिक क्षण पिंगा घालत होते. क्षणभरात माझी त्यांच्याशी जवळीक झाली. इतक्या वर्षांच्या तटस्थतेच्या भिंती धडकन पडून गेल्या. आईच्या आठवणींनी आमची असली ओळख झाली. माझ्याही नकळत मी लहान झालो. त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि सारं काही समजून त्यांनी समंजसपणे मला थोपटले. कशी होती आई? माझ्या आणि बाबांच्या मधली दुवा होती. संयुक्ताशी लग्नाचे ठरविले तेव्हा जरा घाबरत होतो. कारण ती वेगळ्या जातीची, वेगळ्या वातावरणाची, वेगळ्या भाषेची! पण सारं काही आईनं चुटकीसरशी सोडवलं.

 आज संयुक्ता आमच्या कुटुंबात सर्वात आवडती सून आहे. आईच्या जाण्याने ती स्तब्ध आहे. कशा असतात या आठवणी! माणसाला जन्मभर पुरणाऱ्या असतील तर मी मनात नेहमीसाठी जपेन. आभाळाचा ‘आ’ आणि ईश्वराची ‘ई’ या दोन अक्षरांपासून ‘आई’ हा शब्द तयार झाला. त्याची व्यापकता या अक्षरांपासूनच कळून येते.  एक अकृत्रिम प्रेमाची, अपेक्षारहित त्यागाची अनमोल भेट ईश्वरानं मानवाला दिलेली आहे. इतिहासात, पुराणात काही माता आहेत, ज्या जगरहाटीपेक्षा वेगळ्या वागल्या; पण त्यातून जगप्रसिद्ध, माननीय, पूजनीय समाजाला आदर्श वाटणारी व्यक्तिमत्त्वं घडली.

मानवेतर प्राण्यांमध्ये हा मातृभाव दिसून येतो. कुठे मी भरकटतोय, मलाच माझं समजत नाहीये. आज आईसाठी होणारा आकांत मनातून बाहेर पडतोय. सहजच नजर गेली. आज मदर्स डे. मलाच नकळत हसू आलं. आमच्या वेळी कुठले असे डे साजरे करत असू! मला आजच्या तरुणाईचं कौतुक वाटतं. ते अशा दिवसांना महत्त्व देतात. उत्साहानं साजरे करतात. मला आठवतंय, कधीतरी एकदा आईचा वाढदिवस मी साजरा केला होता. मिळालेल्या पैशातनं तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा आणला होता. किती अपूर्वानं तिनं तो माळला होता. तोच माझा मदर्स डे नव्हता?

किती आठवणी? काय आठवू अन् काय नको! कितीतरी वेळ गेला! माझ्या मुंजीच्या वेळेची आई मला आठवतेय! नखशिखांत दागिन्यांनी नटलेली! भिक्षावळ घालताना अपार मायेनं मला न्याहाळणारी!  किती रूप, किती क्षण, किती सोहळे. आज कवी ग्रेस आठवतात. मनस्वी कवी! त्यांची ‘आई’ ही कविता आठवतेय…‘ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता’ किंवा ‘मी घनव्याकूळ रडलो!’ आईच्या मायेतून कोणीच मुक्त होऊ शकत नाही. आपला पहिला गुरू आई असते ना!

दिवस साजरे करणे ही पाश्चात्त्यांची कल्पना आहे. आपण अनुकरणशील आहोत. त्यात वाईट काहीच नाही. काही नाती ही अशा प्रकारे साजरी करण्यासारखी नसतात. ती सदैव स्मरणात असतात. आपल्याशी आपल्यात निगडित असतात. आपल्यातून त्या नात्याला वगळल्यास दोघांचेही अस्तित्व उरत नाही. असंच आई अणि मुलाचं नातं असतं. आई ही आपल्या संपूर्णत्वाची निर्माती असते. आपले सर्वस्व… आणि आपणही तिचे सर्वस्व असतो. ही सामान्यांची बाब झाली. ाढांतिकारक आणि शहिदांनी तर या मातृभावनेला सर्वंकष केलं.  आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपला मातृभाव अर्पण करून आपल्या मातृभावना जागतिक पातळीवर नेल्या. अशी ही माता.

   आई, मी देशभक्त नाही. मी कवी आहे, पण मी तुझा आहे हे नक्की. ‘तुझ्यासाठी आणीन आरतीला हे चंद्र-सूर्य तारे’ असेही म्हणणार नाही. कारण मी अतिशय सामान्य आहे. हो, हे मात्र नक्की की तू माझ्यातून आणि मी तुझ्यातून वेगळे नक्कीच होणार नाही… सदासाठी! मग गुरूजी का गं म्हणाले, 15 दिवसांत मोकळे व्हाल? अगं, तू ये ना… आजही त्या वळणावरील दगड आपली वाट बघताहेत. हो ना?