
नगर शहरातील केडगाव या ठिकाणी सनराईज या तेल कंपनीला रविवारी सायंकाळी आग लागली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह इतर अग्निशमन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली आहे. या आगीत जिवीतहानी झालेली नाही.
केडगाव या ठिकाणी सायंकाळी कंपनीतून धुराचे लोट दिसू लागले. परिसरातील नागरिकांनी याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसी, भिंगार कॅम्प आदींसह इतर अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले.
तेल कंपनी असल्यामुळे या आगीचा धुरळा हा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र दिसून येत होता. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने उशिरा ही आग आटोक्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


























































