
जालना शहरातील भवानी नगरातील अझरखान कैसर खान यांच्या जुन्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये जवळपास 6 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जालना शहरातील भवानीनगरमध्ये असलेल्या एका जुन्या टायरच्या दुकानाला शनिवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे जुने टायर जुळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 2 बंब बोलावण्यात आले. आगीने भीषण रुद्र रूप धारण केले होते. ही आग जवळपास दोन ते अडीच तास सुरू होती.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन ते अडीच तासानंतर आग आटोक्यात आली. भीषण आगीमुळे धुराचे लोट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरले होते. धुराचे लोट इतके प्रचंड होते की दूरवरूनच शहरांमध्ये कुठेतरी आग लागल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, नागरिकांनी छोट्या टँकरच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आटोक्यात येत नसल्याने माजी नगरसेवक वाजेद खान यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कॉल करून आगीची माहिती दिली. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्विफ्ट इन्चार्ज संदीप दराडे, फायरमन नितेश ढाकणे, नागेश घुगे, सागर गडकारी, किशोर सकट, सादिक अली, वाहन चालक रवि तायडे, संजय हिरे यांच्या पथकाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवले.





























































