सरकारचे श्राद्ध घालत ग्रामस्थांचे मुंडण, बारसूच्या सड्यावर रिफायनरीविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. आज बारसूच्या सड्यावर ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध घालत मुंडण करून आंदोलन छेडले. यावेळी एकच जिदद, रिफायनरी रददचा नाराही ग्रामस्थांनी दिला.

25 एप्रिलला माती परीक्षण सुरु होताच बारसूच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन सुरु केले होते. हजारो ग्रामस्थ बारसूच्या सड्यावर एकत्र आले होते. पोलीसांच्या दडपशाहीला न जुमानता ग्रामस्थांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते. माती परीक्षणाच्यावेळी बारसूच्या सड्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे काढण्यात आले होते. त्यातील एका खड्ड्यात ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध करत सरकारचे श्राद्ध घातले. श्राद्धाचा विधी केल्यानंतर ग्रामस्थांनी मुंडण करून आंदोलन छेडले. यावेळी शशिकांत बाणे, चंद्रकांत बंडबे, गणेश डोंगरे, काशिनाथ गोरुले, दीपक जोशी, देवीदास गुरव यांनी मुंडण केले. यावेळी आंदोलकांनी स्वतःच्या शरीरावर एकच जिदद, रिफायनरी रद्द असे लिहून प्रकल्पाचा जोरदार निषेध केला.

माती परीक्षणानंतर रिफायनरीविरोधात आंदोलनाची ठिणगी पडली आहे. दडपशाही करत सरकारने माती परीक्षण रेटले असले तरी ग्रामस्थांचा विरोध प्रचंड वाढला आहे. बारसूसह पंचक्रोशीतील घराघरामध्ये रिफायनरीविरोधातील आंदोलनाचे निखारे पेटत आहेत. टप्याटप्याने ग्रामस्थ आंदोलन छेडणार असून आज मुंडण करून ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध दर्शवला.