
एकेकाळी साधे पाणी दिसणेही मुश्कील झालेल्या मिठी नदीत पवईजवळील नदीपात्रात आता जैवविविधतेमध्ये मोठी वाढ झाली असून चक्क मासेही दिसू लागले आहेत. पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील लाखो लिटर पाण्याची गुणवत्ता सुधारून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
मिठी नदी ही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मिठी नदी प्रदूषित झाल्याने नैसर्गिक रूप हरवले आहे. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला असे नाले या मिठी नदीलाच येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठय़ा नाल्याप्रमाणेच भासत होती. या पार्श्वभूमीवर या मिठीला गतवैभव मिळवून देण्यासाठी ‘मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्प’ अंतर्गत पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पवई भागात दररोज 80 लाख लिटर क्षमतेचा जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प जानेवारी 2023 पासून राबवण्यात येत आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे.
असा आहे प्रकल्प
पालिकेने जानेवारी 2023 मध्ये पवई येथे ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प’ सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत बिनपावसाळी पाणी अडवणे, सांडपाणी एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पाठवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि पाण्यास वापरायोग्य बनवणे या प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेतून शुद्ध केलेले पाणी पुन्हा मिठी नदीत सोडले जाते.


























































