
माजीमंत्री राम शिंदे यांच्या बाबत एक नवीनच प्रकार घडला असून एकाने फेसबुक लाईव्ह करत राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धमकी प्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 मे रोजी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्याकरिता चोंडी येथे गेलो होतो. त्यावेळी मला सागर गवसणे याच्या मोबाईलवरून फोन आला त्यावेळी तो मला म्हणाला की, ‘तुम्ही राम शिंदेच्या जवळ आहात, त्यांना जुळवून घ्यायला सांगा, नाहीतर पाहून घेईन’. त्यावेळी मी काहीही न बोलता फोन कट केला. त्यानंतर मी राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सागर गवसणे याने फोन केल्याची माहिती दिली. त्यानंतर मला अशी माहिती समजली की, सागर गवसणे याने फेसबुकवरील ‘मैत्रीग्रुप’ या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक लाईव्ह करत राम शिंदे व काही अपरिचित व्यक्तींचे नाव घेऊन तुम्हास घरात घुसून मारीन अशी धमकी देत दोन पक्षांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजले असता, तो व्हिडीओ मी फेसबुकवर पाहिला. यानुसार नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुभाष गवसणे रा. पिंपळगाव उंडा, ता जामखेड याच्या विरूद्ध भादवी कलम 504, 505(2), 506(2) नुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.
























































