
आपत्कालीन परिस्थितीत ही पेमेंट सिस्टम काम करेल. कोणत्याही परिस्थितीत व्यवहार थांबणार नाहीत याचीही काळजी घेईल.
इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करणे आता शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) अशा सिस्टमवर काम करीत आहे की, ज्यामुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही यूपीआय पेमेंट करता येईल. आरबीआयची लाइटवेट पेमेंट अॅण्ड सेटलमेंट सिस्टम कार्यरत आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती आलेल्या किंवा हिंसाग्रस्त भागात बऱ्याच वेळा इंटरनेट उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पैशांचे व्यवहार करता यावेत यासाठी ही सिस्टम तयार करण्यात येत आहे. केवळ ठरावीक लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे.
आरबीआयने वार्षिक अहवालात या सिस्टमविषयी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे यूजरच्या मोबाईलला नेटवर्क नसले तरीही या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत. हे पेमेंट सिस्टेम ऑपरेट करण्यासाठी अगदी कमी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज भासेल, असे आरबीआयने म्हटले आहे.
ही सिस्टम केवळ आपत्कालीन वापरासाठी आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही कायम उपलब्ध नसेल. पेमेंटचे इतर मार्ग बंद झाल्यानंतरच ही सिस्टम वापरता येईल.
ही सिस्टम कधी लाँच होणार आहे याबाबत मात्र अहवालात माहिती देण्यात आलेली नाही.

























































