पाथर्डी-बीड मार्गावर करोडीमध्ये ‘रास्ता रोको’; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी पाथर्डी बीड मार्गावर असलेल्या करोडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड व करोडीचे सरपंच आश्रुबा खेडकर यांनी केले. करोडी गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पंचायत समिती स्तरावर हा प्रस्ताव होऊन मंजुरीला जाणे अपेक्षित असताना पंचायत समिती प्रशासनाकडून सुद्धा या प्रस्तावाची दखल घेतली न गेल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.

दीड महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळावे म्हणून प्रस्ताव दाखल केला. मात्र समिती प्रशासनाने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. जून महिना उजाडला तरीही अजून टँकर सुरु नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तातडीने टँकर सुरु केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर आंदोलनाची दखल घेत विस्तार अधिकारी अण्णासाहेब गहिरे ,मंडळ अधिकारी वैशाली दळवी हे आले. त्यांनी तातडीने टँकर सुरु करू असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे एक तास आंदोलन सुरु असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.