
>> विनायक
काय म्हणत होता गॅलिलिओ? एवढंच की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते! टॉलेमीची पृथ्वीकेंद्रित विश्वाची संकल्पना कोपर्निकसने खोडून काढली आणि गॅलिलिओने त्याला दुजोरा दिला इतपंच. तुम्ही म्हणाल, यात नवीन ते काय? आता आपली ग्रहमाला सूर्याभोवती फिरते यात नवल कसलं? आपली अख्खी सूर्यमालाच सूर्यासकट आपल्या आकाशगंगेच्या पेंद्राशी असलेल्या एका शक्तिशाली कृष्णविवराभोवती फिरतेय हे सिद्ध झालंय.
…पण हे आता आधुनिक काळात प्रत्यक्ष प्रमाण अनेक प्रयोगांद्वारे सिद्ध झाल्यावरचं आपलं म्हणणं असतं. तरीही माणूस 1969 मध्ये चंद्रावर गेलाच नव्हता किंवा पृथ्वी गोलाकार नसून ‘सपाट’ (फ्लॅट) आहे अथवा उत्क्रांतीच्या सिद्धांताला काही अर्थ नाही असे मानणारे जगात सर्वत्र आहेत. अगदी प्रगत देशांतसुद्धा. ही जर एकविसाव्या शतकातली स्थिती असेल तर सोळाव्या शतकात जन्मलेल्या गॅलिलिओला रूढीवाद्यांनी विरोध केला यात नवल काय? पण शेवटी या वादात जय गॅलिलिओचाच झाला.
सन 1564 ते 1642 असा गॅलिलिओ गॅलिलीचा काळ आहे. त्याचे वडील ल्युटेनिस्ट म्हणजे एक प्रकारचं तंतुवाद्य वाजवणारे कलाकार आणि संगीतकार होते. गॅलिलिओलासुद्धा त्यांनी हे वाद्य शिकवलं होतं. त्याचा धाकटा भाऊ मायकेलेन्जेलो तर हे ‘ल्यूट’ नावाचं वाद्य वाजवण्यात निष्णात होता. गॅलिलिओची बुद्धिमत्ता जाणून त्याने यशस्वी डॉक्टर व्हावं असंही त्याच्या वडिलांना म्हणजे व्हिन्सेन्झो गॅलिली यांना वाटायचं. त्यासाठी त्यांनी त्याला इटलीमधल्या कलत्या टॉवरसाठी प्रसिद्ध असलेल्या पिसा येथील विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम करण्यासाठी दाखल केलं. गॅलिलिओला वडिलांकडूनच लाभलेला आणखी एक गुण होता चिकित्सक पद्धतीने विचार करण्याचा. कॉलेजात असताना वाऱ्याच्या झोताने हेलकावणारं झुंबर पाहून अचानक त्याच्या मनात कल्पना आली. त्याने कमी-अधिक दोऱ्यांना टांगलेले दोन लंबक झुलते ठेवून निरीक्षण केलं तर ते सारखेच आंदोलनं करत असल्याचं त्याला जाणवलं.
एकदा तर पिसा येथील कलत्या (लिनिंग) टॉवरवरून त्याने दोन वेगळय़ा वजनाच्या वस्तू खाली टाकल्या. त्या सारख्याच वेगाने खाली गेल्या. त्यातून त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण आणि वस्तुमानाची कल्पना आली. असे विविध प्रयोग सुरू असतानाच त्याने ‘हायड्रोस्टॅटिक बॅलॅन्स’चा शोध लावला. 1586 मध्ये गॅलिलिओने त्याविषयीचं पुस्तकच प्रसिद्ध केलं. अशा संशोधनांमागचा गणिती अभ्यास हा या लेखमालेचा हेतू नसून जगाच्या पारंपरिक धारणा बदलत आधुनिकतेकडे नेणाऱ्या संशोधकांचा थोडक्यात परिचय असा उद्देश आहे.
1589 मध्ये गॅलिलिओ पिसा विद्यापीठातच गणिताचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. आता त्याला वैज्ञानिक जगतात मानसन्मान मिळण्याचा काळ आला होता, परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला भावाचा सांभाळ करण्यासाठी पेडुआ येथे परतावं लागलं. गॅलिलिओ तिथे भूमिती आणि यंत्रशास्त्र (मेपॅनिक्स) शिकवू लागला. याच काळात विविध विषयांचा अभ्यास करता करता त्याच्या विचारांचा लंबक खगोलशास्त्राकडे गेला. केप्लर या शास्त्रज्ञाने शोधलेल्या एका तेजोमेघाचा अभ्यास करताना त्याला एकूण विश्वाबद्दलची ऑरिस्टॉटलच्या काळापासून रूढ असलेली ‘इम्युटेबिलिटी’ म्हणजे अपरिवर्तनाची रूढ संकल्पना योग्य नसल्याचं वाटलं.
वास्तविक वैज्ञानिक संशोधनात प्राथमिक पातळीवरच्या कल्पना मागे सारत नव्या संकल्पनांचा उदय होत असतो. ही एक वैचारिक उत्क्रांतीच असते. मात्र बुद्धिमान संशोधकाला ती जितक्या चटकन जाणवते तेवढी सर्वसामान्यांना समजणं कठीण असतं. गॅलिलिओचा हा वैश्विक ‘नवमतवाद’ रूढीवाद्यांना पटत नव्हता. त्यातच त्याने हॅन्स लिपर्शेच्या दुर्बिणीमध्ये वर्धनक्षमता वाढवून अवकाशातील वस्तूंकडे ती रोखली तेव्हा तर ही ‘भयंकरच’ गोष्ट मानली गेली. चंद्रावरची विवरं, शुक्र ग्रहाची चंद्रासारखी कोर, गुरूचे चार चंद्र आणि शनीची कडी तसंच नेपच्यूनपर्यंतच्या ग्रहमालेचं यथार्थ दर्शन त्या काळात स्वीकारार्ह नव्हतं. त्या तुलनेत आपल्याकडे ग्रहगणितात राहू-केतू या काल्पनिक बिंदूंचा विचार करणाऱ्यांना शिक्षा वगैरे झाल्या नव्हत्या. जनसामान्यांमध्ये मात्र ग्रहणांबद्दलचा रूढीवाद गेल्या काही दशकांपर्यंत होता.
गुरूचे चंद्र हे आधी त्याला ‘तारे’ वाटले, पण नंतर एखादा मध्येच ‘अदृश्य’ होतो म्हणजे तो त्याचा उपग्रह असणार, असा निष्कर्ष निघाला. शनीची कडी पृथ्वीच्याच रेषेत असताना त्याला दोन्हींकडे दोन ‘कान’ आहेत की या तीन वेगळय़ा वस्तू आहेत? असाही पडलेला प्रश्न सततच्या निरीक्षणाने सुटला. या नव्या शोधांचं स्वागत मात्र झालं नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही कल्पनाच रूढीवाद्यांना पचण्यासारखी नव्हती. गॅलिलिओवर खटला झाला आणि सदुसष्टाव्या वर्षी त्याला नजरपैदेची शिक्षा झाली, ती अखेरपर्यंत. या काळात त्याच्याकडे आलेल्या बार्सेलोमे म्युरिलो या चित्रकाराने त्याचं जे चित्र काढलं त्यात त्याने गॅलिलिओचे ‘इ पर सी मूव्हे’ म्हणजे ‘येट इट मूव्हज्’ किंवा ‘तरीही पृथ्वीच सूर्याभोवती फिरते’ असं सूचित केल्याचं नोंदलं गेलं. ते 1911 मध्ये लक्षात आलं. 8 जानेवारी 1642 रोजी या महान संशोधकाने अपमानित अवस्थेत जगाचा निरोप घेतला आणि तब्बल 350 वर्षांनी धर्मपीठाने त्याचं म्हणणं मान्य केलं. वैज्ञानिक संशोधनासाठी असा त्याग करणाऱ्यांनीच ‘विश्व’रूप दर्शन वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला घडवलं आहे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. पृथ्वीची गती सांगणाऱ्या गॅलिलिओची ‘कर्म’गती ही अशी होती!



























































