इंतहा हो गई, इंतजार की… एकदिवसीय वर्ल्ड कपच्या कार्यक्रमाची अवघ्या जगाला प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कप म्हटला की त्याचा कार्यक्रम किमान वर्षभर आधीच निश्चित केला जातो. गेल्या वेळी इंग्लंडमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप होता, त्याचा कार्यक्रम 13 महिने आधीच जाहीर झाला होता. 2015 साली ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप होता, त्याचा कार्यक्रम तर दीड वर्ष आधीच लोकांच्या हातात होता, पण यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानात वर्ल्ड कप आहे. स्पर्धेला चार महिन्यांपेक्षा कमी काळ उरला असूनही अद्याप वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करण्यात आयसीसी आणि बीसीसीआय दोघांनाही अपयश आले आहे. आता जाहीर होईल, आता जाहीर होईल असे बोलता बोलता स्पर्धा तोंडावर आलीय.

एका क्रिकेट वेबसाईटने मार्चमध्ये दिलेल्या वृत्तानुसार यंदाचा वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान खेळविला जाणार असल्याचे म्हटले होते, मात्र अद्याप आयसीसी किंवा बीसीसीआयने या तारखांबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.

लवकरच तारखा जाहीर करू – अलार्डिस

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या सहभागाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्यामुळे एकदिवसीय वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. यावर ठोस तोडगा काढण्यात आयसीसीला यश न लाभल्यामुळे हा विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र लवकरच कार्यक्रमाच्या तारखा आणि सामन्यांचे ठिकाण जाहीर करू, असे आश्वासन आयसीसीचे मुख्य अधिकारी जेफ अलार्डिस यांनी दिले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यादरम्यान वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असे म्हटले होते, मात्र अलार्डिस यांनी कार्यक्रम इतक्या लवकर जाहीर केला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

– बीसीसीआय आम्हाला आताही कार्यक्रम देऊ शकते. मात्र आम्ही स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि ब्रॉडकास्टर्सची सध्या चर्चा करतोय. येत्या एक-दोन दिवसांत अंतिम कार्यक्रमाबाबत काही महत्त्वाचे ठरले जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपचा पूर्ण कार्यक्रम लवकरच क्रिकेटप्रेमींच्या हातात असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा हा विलंब पाकिस्तानच्या विरोधामुळे होतोय का असे छेडले असता अलार्डिस यांनी या विषयाला टाळणेच पसंत केले.