आधी कसोटी, नंतर कौंटी; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराकडून संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी संघातून वगळल्यानंतर लिसेस्टरशायरकडून कौंटी क्रिकेट खेळणारा अजिंक्य रहाणे आता आगामी वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका खेळणार आणि त्यानंतरच कौंटी क्रिकेटसाठी इंग्लंडला दाखल होणार आहे. तसेच ससेक्सकडून खेळत असलेला चेतेश्वर पुजाराही कसोटी मालिकेनंतरच आपले कौंटी क्रिकेट सुरू ठेवेल.

आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची निवड अद्याप केलेली नाही. मात्र या मालिकेसाठी संघात काही मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयच्या सूत्रांनी आधीच दिले आहेत. डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यामुळे धावा करण्यात अपयशी ठरलेल्या आणि थकलेल्या रोहितला विश्रांती देण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे विंडीजच्या दुबळय़ा भासणाऱया संघाविरुद्ध अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपविण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दीड वर्षानंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन करणाऱया अजिंक्यने ओव्हलवर 89 आणि 46 धावा ठोकून आपल्यात अजूनही धावांची भूक असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे अचानक संघात आलेला अजिंक्य या कामगिरीमुळे विंडीज दौऱयासाठी तर असेलच पण सोबतीला कर्णधारपदाची दुहेरी जबाबदारीही सांभाळू शकतो.

लिसेस्टरशायरशी केलेल्या करारानुसार अजिंक्यला जून ते सप्टेंबरदरम्यान 8 प्रथम श्रेणी सामने आणि पूर्ण रॉयल इंग्लंड कप खेळायचे आहे. पण तो अचानक झालेल्या कसोटी निवडीमुळे कौंटी खेळायला जाऊ शकला नाही. आताही तो कसोटी खेळणार असल्यामुळे तो विंडीजची मालिका संपल्यानंतरच पुन्हा इंग्लंड गाठेल. तो ऑगस्टमध्ये रॉयल इंग्लंड कप खेळेल आणि सप्टेंबर महिन्यात चार कौंटी सामनेही खेळेल, अशी बीसीसीआयच्याच सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच पुजारा डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी कौंटी खेळतच होता. ससेक्सचा कर्णधार असलेल्या पुजाराने सहा सामन्यांत तीन शतकांसह 545 धावा केल्या आहेत. तोसुद्धा आपले उर्वरित कौंटी सिझन विंडीज दौऱयानंतर सुरू ठेवेल. सध्या हिंदुस्थानचा अर्शदीप सिंग हाच एकमेव खेळाडू कौंटी क्रिकेट खेळतोय.