पदवी मिळाल्याचा आनंद व्यक्त करणं विद्यार्थीनीला पडलं भारी, सोशल मीडियावर होतोय व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवी मिळाल्याचा डान्स करत आनंद व्यक्त करणं एका विद्यार्थीनीला भारी पडले आहे. तिच्या या कृतीमुळे तिला पदवी नाकारण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना संताप अनावर झाला असून शाळेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ही घटना अमेरीकेतील फिलाडेल्फियाच्या गर्ल्स हायस्कूलची आहे. 9 जून रोजी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की,पदवी घेण्यासाठी स्टेजवर आल्यावर अतिउत्साह, ओरडणे किंवा टाळ्या वाजवणे याला मनाई करण्यात आली होती. दरम्यान, अब्दुल रहमान नावाच्या विद्यार्थीनीचे नाव घेण्यात आले. तिला नियम माहीत होते, त्यामुळे ती पदवी घेण्यासाठी जात असताना तिने नियमांचे पूर्ण पालन करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यासपीठावर पाऊल ठेवताच तिला आपला आनंद लपवता आला नाही आणि ती पदवी घेण्यासाठी गेली. त्यावेळी ती हसली आणि थोडा डान्सही केला. मात्र हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेला तिची ही गोष्ट खटकली आणि तिला पदवी नाकारण्यात आली. तिला तत्काळ व्यासपिठावरुन खाली जायला सांगितली.

मुख्याध्यापकांनी पदवी देण्यास नकार दिल्याने ती निराश झाली.तिने फॉक्स29 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या कृतीबाबत खेद व्यक्त करते.मला अजिबात कल्पना नव्हती की, माझ्यासोबत असे काही होईल. जरी मी काही नियम तोडले असले तरी ही पदवी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण हे फक्त माझ्यासाठीच नाही, तर माझ्या त्या बहिणीसाठीही आहे जिला 2014 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

अब्दुल रहमानची आई जस्मिन रीड यांनी सांगितले की, 4 वर्षांच्या शिक्षणात या मुलींना खूप काही सहन करावे लागले. कोविड काळाने त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.आता शाळेकडून तिला अपमानित केले जात आहे. हसणे चुकीचे कसे काय? ती अन्य कोणावरही हसत नव्हती. मात्र त्यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अब्दुलला पदवी देण्यात आली. यावेळी शाळा प्रशासनाने सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करु शकत नाही. शाळेची एक शिस्त असते आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याने जपली पाहिजे. असो, जे काही घडले, त्याची चौकशी करून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जातील.