अ’जून’ पत्ता नाही… ये रे ये रे पावसा तुला देतो खोका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दरवर्षी 7 जूनला येणारा मान्सूनचा अजूनही पत्ता नाही. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? याप्रमाणे हवामान खात्याकडूनही केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत, मात्र पाऊस काही पडत नाही. यामुळे ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ऐवजी  आता ‘तुला देतो खोका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 23 जूनला मान्सूनचे आगमन होईल असे सांगितले जात आहे. हा अंदाज खरा ठरावा आणि वरुणराजाने कृपा करावी यासाठी सर्वांनी देव पाण्यात बुडवले आहेत.

जून महिना सरला तरी महाराष्ट्रात पावसाचा पत्ता दिसत नाही. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून पावसाला उशीर होण्याचा अंदाज आहे.

लांबलेल्या पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. धरणांमधील पाणीसाठाही खोलवर गेला आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनीही तळ गाठला आहे.

म्हणे मुंबईसह कोकणात शनिवारपासून बरसणार 

चक्रीवादळाच्या परिणामामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडला, मात्र तो मान्सूनचा पाऊस नाही. या राज्यांमध्ये अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र कोकणात रत्नागिरीत 11 जूनला आलेला मान्सून येत्या शनिवार किंवा रविवारपासून सक्रिय होण्याची दाट चिन्हे आहेत. तसे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात मान्सून बरसेल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेतील संशोधिका सुषमा नायर यांनी दिली.