विठ्ठल गीती गावा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपट आणि मराठी संस्कृती, परंपरा यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे, असं म्हटलं जातं. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लाखो भाविक जात असतात. पंढरीच्या वारीचं चित्रण करणारी किंवा विठ्ठलविषयक अनेक गाणी मराठी चित्रपटात आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो ‘लय भारी ’ या चित्रपटातील ‘माऊली माऊली’ या अतिशय लोकप्रिय गीताचा. चित्रपटाची सुरुवातच या गीतातून होते. गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीताला संगीतकार अजय-अतुल यांनी स्वरबद्ध केले आहे. गायक कलाकार अजय यांनी ते गीत गायले आहे. संपूर्ण पंढरीची वारी, वारकऱयांनी केलेला गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत पुढे जाणारे लोक, पालखी, पंढरपूरचे मंदिर हे सर्व या गाण्यातून दिसते.

संत तुकारामांच्या जीवनावर आधारित जे चित्रपट येऊन गेले, त्यापैकी अलीकडच्या काळातील ‘तुकाराम’ या चित्रपटात संत तुकारामांची भूमिका अभिनेता जितेंद्र जोशी याने केली होती. या चित्रपटात वारी गीते आहेत. तसेच  ‘जगण्याचा पाया,  चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम’ या गीतातदेखील वारकऱयांचे चित्रण आहे. तसेच ‘होईन भिकारी, पंढरीचा वारकरी’ हे  खास असे वारीचे चित्रण करणारे गीत आहे. हे गीत ज्ञानेश्वर मेश्राम आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायले आहे. संत तुकारामांचा हा अभंग आहे. ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट खूप गाजला होता. जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ अशा अनेक कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. ‘पंढरीची वारी, जयाचिये कुळी’ हे या चित्रपटातील गीत वारीचे चित्रण करते. हे गीत पंडित भीमसेन जोशी यांनी गायले आहे. या चित्रपटातील भक्तिगीते खूप गाजली. ‘मागणे ते एक तुज’ हे अनुप जलोटा यांनी गायलेले आणि अनुप जलोटा यांच्यावरच चित्रित झालेले गीतसुद्धा खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाचे संगीतकार बाळ पळसुले होते. ‘विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपटदेखील वारीचे चित्रण करणारा होता. यातील सर्वच गीते श्रवणीय होती. ‘ही वाट कशी अन् कुठे मला नेईल,  मी आज कुठे अन् उद्या कुठे जाईन’ या गीतात वारीचे चित्रण आहे. रवींद्र साठे यांनी हे गीत गायले आहे. या चित्रपटातील ‘मन माझे चपळ’ हे गीतदेखील लोकप्रिय झाले होते. मिलिंद गवळी, मिताली जगताप आणि वृंदा गजेंद्र यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते संगीतकार सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केली आहेत. ‘गजर’ हा मराठी चित्रपट तर पूर्णपणे ‘पंढरीची वारी’ हाच विषय घेऊन निर्माण झाला होता. वारीच्या अठरा दिवसांच्या कालावधीत पार्थ नामक दिग्दर्शकाच्या जीवनात पंढरीची वारी कशी परिवर्तन घडवून आणते, हे या चित्रपटातील कथानकातून उलगडले होते. चिन्मय मांडलेकर, उमेश जगताप, संजीव चोप्रा, एडवर्ड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. ‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ नावाची एक डॉक्युमेंट्रीसुद्धा वारीबद्दल भाष्य करणारी आहे. अनेक मराठी चित्रपटांत विठ्ठलाची महती सांगणारी, त्याच्या भक्तीचा महिमा सांगणारी गाणी आहेत. ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गीत खूप लोकप्रिय झाले आहे. तसेच ‘पर्ण पाचू सावळा सावळा, मी वारकरी आगळा’ हे ‘भालू’  चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील गीतसुद्धा गाजले होते. ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ हे सुधीर फडके यांनी गायलेले गीत ‘प्रपंच’ चित्रपटात आहे, तर ‘माऊली’ या चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे गीतसुद्धा विठ्ठलभक्तीबद्दल भाष्य करते. यातदेखील वारीचे चित्रण आहे. हे गीत अजय-अतुल यांनी स्वरबद्ध केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, संयमी खेर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने या गीतांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

>> गणेश आचवल