…म्हणून या सर्व घडामोडींचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच! शरद पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या घडामोडीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता जनतेसमोर जात आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. असे प्रकार आपल्याला नवीन नाहीत. जे गेले त्यांच्या भवितव्याची चिंता आहे, असेही ते म्हणाले. आपण 5 जणांच्या मदतीने पक्ष उभा केला आहे. आपल्याला त्याचा चांगला अनुभव असल्याने पुन्हा पक्ष उभा करू आणि आमची संख्या वाढवू, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य केले होते. त्यात त्यांनी आमच्या पक्षाबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या. राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात अडकलेला पक्ष आहे, असे ते म्हणाले होते. त्यांनी सिंचनाबाबतच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्षावरील आरोप आणि मंत्रिमंडळात सहभागी नेत्यांना त्या आरोपातून मुक्त केले. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. 6 तारखेला पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आपण बोलावली होती. त्यात संघटनात्मक बदलाबाबत चर्चा करण्यात येणार होती. त्यावेळी काही सहकाऱ्यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबाबतचे स्पष्ट चित्र आणखी दोनतीन दिवसात स्पष्ट होईल. आज शपथविधी झालेल्या काहीजणांनी संपर्क साधून आपल्याला येथे बोलावून आमच्या सह्या घेतल्या, असे सांगितले.आमची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी आपल्याकडे केला आहे. त्यामुळे आणखी दोनतीन दिवसात चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे आता याबाबत आपण जास्त बोलणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

हा प्रकार इतरांना नवीन असेल, आपल्याला हा प्रकार नवीन नाही. 1980 मध्ये निवडणुकीनंतर आपण ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो. त्याचे 58 आमदार निवडून आले होते. त्यानंतर एक महिन्याने 6 जण सोडून इतरजण पक्ष सोडून गेले. आपण 58 जणांचे विरोधी पक्षनेता होतो. त्यानंतर मी 5 जणांचा नेता होतो. त्या 5 जणांना सोबत घेत आपण पक्ष बांधायला सुरुवात केली. त्यानंतर आमची संख्या 69 वर गेली. मी 5जणांचा नेता असूनही आमची संख्या वाढली. तसेच पक्ष सोडलेले 3-4 जण सोडून इतर जण पराभूत झाले. त्यामुळे 1980 मध्ये जे चित्र होते. तेच चित्र पुन्हा उभे करण्याचा माझा एककलमी कार्यक्रम आहे.

आपला राज्यातील जनतेवर आणि तरुणपिढीवर प्रचंड विश्वास आहे. देशातून अनेकजणांचे फोन आपल्याला येत आहेत. अनेकजण आमच्यासोबत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत.आपण सगळे एक आहोत,परिस्थितीतही आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. थोड्यावेळापूर्वी ममता बॅनर्जी यांचा फोन आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचाही फोन आला. देशात पर्यायी शक्ती उभी करण्याचा निर्धार असलेले नेते आपल्यासोबत आहोत. त्यामुळे या झालेल्या घटनेची आपल्याला पर्वा नाही.

आजचा दिवस संपलेला आहे. उद्या आपण बाहेर पडून कराडला जाणार आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत राज्यात आणि देशात जात जनतेशी संपर्क साधणार आहोत. बाहेर पडलेल्यांनी पक्षावर दावा केला तरी जनतेवर आपला विश्वास आहे. आमच्या काही भूमिका आहेत. राष्ट्रवादी पक्ष आपण उभा केला. त्यामुळे जनतेत जाऊन आमची भूमिका मांडू, जनतेला आम्हाला पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला, याची आम्हाला माहिती नाही. त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला असेल, आम्हाला त्याबाबत माहिती नाही. त्यांनी पक्षावर दावा केली तरी आम्ही जनतेत जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत. विरोधी पक्षनेत्याचा विचार आम्ही लवकरच घेणार आहोत. आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यांच्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यातील संभअरम दूर करण्यासाठी पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करणार आहोत.

हा पक्षाच्या धोरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षातील नेते याबाबत निर्णय घेतील. पक्षाच्या हितासाठी योग्य पावले टाकण्याची गरज आहे.काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पार पाडली नाही. त्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे याबाबतचा निर्णय सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.तेथे गेलेल्याबाबत माहिती नाही. जाण्यापूर्वी भुजबळ यांनी असे होत आहे, मी जातो आणि कळवतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी शपथ घेतल्याचे कळवले. हा प्रश्न घराचा नाही. जनतेसमोर आपण काय भूमिका घेतो, याचा हा प्रश्न आहे. जे गेले त्यांची आपल्याला चिंता नाही, मात्र गेले त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. या घटनेचे श्रेय द्यायचे असेल, तर ते पंतप्रधानांना द्यावे लागेल. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याने अस्वस्थता वाढली. त्याचा हा परिणाम असावा, त्यामुळे याचे श्रेय त्यांना आहे. ईडीच्या चौकशीमुळे आमच्यातील काहीजण अस्वस्थ होते.आता ते चौकशीतून कधी मुक्त होतात, त्यातून जनतेसमोर काय चित्र स्पष्ट होते, त्यातून हे ईडी सरकार आहे काय, ते स्पष्ट होईल.

जे सोडून गेले त्यांना मतदारसंघ आणि पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी असलेले संबंध याची चिंता आहे. त्यांना सत्तेचा फायदा होईल, दोन-तीन कोमे होतील. या गोष्टी यश देतील, असे नाही. शेवटी जनता महत्त्वाची आहे. त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. त्यामुळे काहीजण आमच्या संपर्कात आहेत. आम्ही न्यायालयीन लढाई किंवा इतर कशातही जाणार नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि आमचा पक्ष आम्ही एकत्र आहोत. ज्यांना जायचे होते, ते गेले. ज्यांना जायचे नाही ते थांबले आहेत. आता निवडणुकीत तुम्हाला आमची नवी टीम दिसेल. राज्याच्या हिताचा विचार करणारी टीम आम्ही निर्माण करू. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. त्यामुळे त्यांनी जबाबदारी ओळखून योग्य ती पावले उचलावीत.

निवडणुकीपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लागणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून निर्णय येईल, अशी अपेक्षा आपल्याला नाही. त्यामुळे आता निवडणुकीची तयारी हेच ध्येय आहे. आता पक्षबांधणी हेच आमचे ध्येय आहे. पक्षबांधणी करून जनतेसमोर जाणार आहोत. तसेच जे पक्ष सोडून गेले, त्यांच्यावर पक्षाच्या धोरण आणि पक्षाच्या प्रक्रियेप्रमाणे कारवाई होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

जनतेचा पाठिंबा मिळणे, जनतेला आपले धोरण समजावणे, यातून पक्ष उभा राहतो. पक्षाचे नाव आणि चिन्ह याला महत्त्व नाही. आमच्या घड्याळ या चिन्हाला काहीही होणार नाही. याआधीही आपण अनेक चिन्ह्यांवर निवडणूक लढवली आहे. आपण जनतेसाठी काय करतो, यावर जनता मत देते. आपण 14 निवडणुका लढलो आहोत. त्यात जनतेने आपल्याला पाठिंबा दिला आहे. आता पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघनेचा मजबूत करण्यावर जोर देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.